शिकाऊ उमेदवारांना रोखण्यासाठी केवळ २५ जवानांचा बंदोबस्त

पहाटेच्या पहिल्या लोकलपासून मुंबईकरांचा नियमितपणे सुरू होणारा प्रवास आणि पाहता पाहता अचानक लाखो प्रवाशांना वेठीस धरणारे सुरू झालेले आंदोलन. मंगळवारी सकाळी सात वाजता माटुंगा ते दादर स्थानकांदरम्यान रेल्वेत शिकाऊ उमेदवार असणाऱ्या युवकांनी रेल रोकोचे हत्यार उपसले आणि मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवा वेठीस धरली. मात्र २५० ते ३०० आंदोलनकर्ते येणार असल्याचा अंदाज बांधणाऱ्या रेल्वे पोलिसांचा हाच अंदाज चुकला आणि काहीशे आंदोलकर्त्यांचे रूपांतर हजारोंमध्ये झाले. आंदोलनाची तीव्र होत गेलेली धार, हाताबाहेर गेलेली परिस्थीती आणि या गोंधळात पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये झालेली झटापट असेच काहीसे चित्र घटनास्थळी होते.

रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेबरोबच विविध कार्यशाळा आणि विभागांमध्ये इलेक्ट्रिशियन, गँगमन, ट्रॅकमन, मॅकेनिकल, खलाशी अशा विविध जागांसाठी निवड केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण (अप्रेंटिसशिप)दिले जाते. अशा प्रकारे सुमारे १,८०० उमेदवारांना रेल्वेकडून प्रशिक्षण दिलेले आहे. २०१६ पूर्वी त्यांना रेल्वेच्या नोकऱ्यांमध्ये समाविष्ट केले होते. परंतु, २०१६ मध्ये रेल्वेच्या नोकऱ्यांमध्ये त्यांना समाविष्ट करणे बंद करण्यात आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे त्याबाबत विनंतीही करण्यात आली. त्यांना रेल्वेत समाविष्ट करून न घेतल्याने रेल्वे पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता सकाळी सात वाजल्यापासून १००० ते १,२०० प्रशिक्षणार्थी माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेर शहर हद्दीत जमल्याचे लोहमार्ग पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकातून सांगण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोबडे, मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे आणि अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशिक्षणार्थीनी बोबडे यांना बाजूला ढकलले आणि रुळावर येऊन रेल रोको करू लागले. प्रशिक्षणार्थीना रेल्वे पोलिसांकडून समजविण्याच प्रयत्न करण्यात आला आणि त्यांना रुळावरून बाजूला करण्यात आले असता त्यांच्याकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने आणि लोहमार्ग पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपस्थित नव्हते. अखेर परिस्थिती हाताळण्यासाठी आणखी मनुष्यबळ मागविण्यात आले. पुरेसे मनुष्यबळ येताच आंदोलन बेकायदेशीर असल्याचा आणि तेथून जाण्याचा इशारा देण्यात आला. तरीही आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

यासंदर्भात रेल्वे सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळच असणाऱ्या कार्यशाळेतून २५० ते ३०० शिकाऊ उमेदवार आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाचे अवघे २५ जवान आणि काही लोहमार्ग पोलीस हजर होते. मात्र, बघता बघता एक हजारपेक्षा जास्त आंदोलक आले. यामध्ये पाच टक्के तरुणींचाही समावेश होता. देशभरातील काही भागांतूनही प्रशिक्षणार्थी आंदोलनात सामील झाले होते. आंदोलकांची संख्या पाहून त्यानंतर रेल्वे पोलिसांचे मनुष्यबळ वाढवावे लागल्याची त्यांनी सांगितले.

यापूर्वी दिल्लीतही आंदोलन

यापूर्वी शिकाऊ उमेदवारांनी याच मागणीसाठी दिल्लीत आंदोलन केले होते. त्या वेळी अर्धनग्न आंदोलन करून सरकारचा निषेध केला होता.