पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू; १८ कलमांचा वापर

रेल्वेत विविध पदांवर शिकाऊ उमेदवार म्हणून काम करणाऱ्यांनी मंगळवारी मध्य रेल्वेवर रेल रोको आंदोलन केले. हे आंदोलन करताना लोकल गाडय़ांबरोबरच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलिसांवरही दगडफेक केली. यात १६ पोलीस जखमी झाले. साडे तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर लोहमार्ग पोलिसांनी रेल रोको केलेल्या एक हजार ते बाराशे आंदोलनकर्त्यांंवर कलम ३०७ यानुसार हत्येच्या प्रयत्नासह सरकारी कामांत अडथळा, दंगल यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रेल्वेत विविध पदांसाठी निवड केलेल्या उमेदवारांना रेल्वेकडून प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर त्यांना रेल्वेच्या नोक ऱ्यांमध्ये सामावून घेतले जाते. मात्र, २०१६ सालानंतर अशा प्रकारची भरती प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी करत मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून माटुंगा ते दादर स्थानकादरम्यान १००० ते १,२०० प्रशिक्षणार्थीनी रेल रोको करण्यास सुरुवात केली. रेल रोको करताना पोलिसांवर दगडफेक आणि लोकल गाडय़ा तसेच लांब पल्ल्यांच्या गाडय़ांवरही दगडफेक करण्यात आली. दगडफेकीनंतर १६ पोलीस जखमी झाले. यात लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाबरोबरच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. याची दखल घेत कलम ३०७ नुसार हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण विविध १८ कलमांचा वापर करत गुन्हा नोंद केली आहे. यामध्ये भारतीय रेल्वे कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअन्वयेही कलमांचा वापर करण्यात आला आहे.

नोकरीवरही परिणाम शक्य

दरम्यान, या कलमांचा वापर केल्यानंतर आंदोलनकर्ते असलेले शिकाऊ उमेदवार यांच्या नोकरीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. रेल्वेत किंवा अन्य ठिकाणी नोकरी मिळवताना पाहिली जाणारी गुन्हेगारी पाश्र्वभूमी यामुळे नोकरी मिळणेही कठीण होऊ शकते, अशी माहिती रेल्वे पोलिसांतील सूत्रांकडून देण्यात आली.

दोन जण ताब्यात

दोन आंदोलकांना घटनास्थळावरून लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. जळगाव येथे राहणारा गोकुळ लोहार आणि नेरुळ येथील अतिश साव अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हजारपेक्षा जास्त आंदोलनकर्ते रेल रोकोत सामील होते. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांची माहिती घेऊन पुढील कारवाई करू. घटना पाहून सध्या तरी काही कलमांचा वापर करण्यात आला आहे. परंतु आंदोलनात सामील झालेल्या प्रत्येक शिकाऊ उमेदवाराचा किती आणि कसा सहभाग होता याची सविस्तर माहिती घेण्यात येईल.

निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग पोलीस