परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या कामासाठी सल्लागार; अंधेरीतील मार्गिकेची निविदा

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पश्चिम व मध्य रेल्वेकडून उड्डाणपुलांच्या विविध कामांना गती दिली जात आहे. गोखले उड्डाणपुलाच्या पादचारी मार्गिकेच्या कामासाठी निविदा, तर पश्चिम रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या परळ स्थानकातील उड्डाणपुलासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडूनही ठाणे ते नाहूर दरम्यान दोन उड्डाणपुलांचे काम केले जाणार असून त्यासाठी १०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका रुळावर कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली होती. पश्चिम रेल्वेही पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेनंतर रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल, पादचारी पूल व अन्य पुलांची सुरक्षा तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासनाला दिल्या. त्यानुसार उड्डाणपुलांची दुरुस्ती, बांधकाम जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. गोखले उड्डाणपुलावरील कोसळलेली पादचारी मार्गिका नव्याने बांधण्यात येणार असून त्यासाठी पश्चिम रेल्वेकडून निविदाही काढण्यात आली आहे. या कामाबरोबरच पश्चिम रेल्वेच्या हद्दीत येत असलेला परळजवळील उड्डाणपुलाची (डेलिस आरओबी)पुनर्बाधणीही केली जाणार आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानक व परळ स्थानकाला जोडणारा बारा मीटर लांबीची जोड पूल पश्चिम रेल्वेकडून आठ महिन्यात बांधून प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आला. तशाच प्रकारे रेल्वे हद्दीत येणाऱ्या परळ येथील उड्डाणपुलाची पुनर्बाधणी त्वरित करावी, यासाठी अभियंता आणि सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.  पश्चिम रेल्वेबरोबर मध्य रेल्वेनेही उड्डाणपुलांची कामे त्वरेने हाती घेतली आहेत. ठाणे ते मुलुंड स्थानकादरम्यान आणि नाहूर ते मुलुंड स्थानकादरम्यान असलेल्या दोन उड्डाणपुलांचे रुंदीकरण व पुनर्बाधणी केली जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून निविदाही काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे ते मुलुंडदरम्यान कोपरी येथे पूर्व द्रूतगती महामार्गावरील पुलासाठी ५३ कोटी ४६ लाख रुपये, तर नाहूर ते मुलुंड स्थानकादरम्यान असलेल्या पुलाच्या कामासाठी ५५ कोटी २७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही पुलांची कामे अडीच वर्षांत पूर्ण केली जातील.

पश्चिम रेल्वेवरील उड्डाणपुलांची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. परळ स्थानकात नुकताच नवीन पादचारी पूल सात ते आठ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात आला. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे हद्दीत येणाऱ्या परळ येथील उड्डाणपुलाचे कामही त्याच पद्धतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पश्चिम रेल्वेवरील उड्डाणपुलांची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. परळ स्थानकात नुकताच नवीन पादचारी पूल सात ते आठ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात आला. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे हद्दीत येणाऱ्या परळ येथील उड्डाणपुलाचे कामही त्याच पद्धतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.  – रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे