प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शहाड व खारेगाव उड्डाणपूल अर्धवट अवस्थेत

रेल्वेच्या वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या आणि लोकांच्या सुरक्षेसाठीही धोकादायक असलेल्या रेल्वे फाटकांना पूर्णविराम देत त्या जागी उड्डाणपूल बांधण्याची रेल्वेची नीती स्थानिक महापालिकांच्या उदासीनतेमुळे पेंड खात पडली आहे. रेल्वेने २०१५मध्ये शहाड-आंबिवली येथे उभारलेला आणि नुकताच खारेगाव येथे उभारलेला असे दोन उड्डाणपूल अर्धवट अवस्थेत पडून आहेत. या उड्डाणपुलांपोटी रेल्वेचे एकूण १७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पण ठाणे व कल्याण-डोंबिवली या दोन महापालिकांच्या हद्दीतील उड्डाणपुलांचे बांधकाम पूर्ण झाले ले नाही.

शहाड आणि आंबिवली या स्थानकांदरम्यान असलेले रेल्वे फाटक बंद करण्यासाठी मध्य रेल्वेने उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव कल्याण-डोंबिवली महापालिकेसमोर ठेवला होता. या प्रस्तावानुसार रेल्वेच्या हद्दीतील उड्डाणपुलाचे बांधकाम रेल्वे करणार असून महापालिकेच्या हद्दीतील पुलाच्या बांधकामाची जबाबदारी पालिकेकडे होती. या बांधकामाचा खर्च निम्मा वाटून घेण्याचेही ठरले होते. त्यानुसार रेल्वेने २०१५ मध्ये विशेष ब्लॉक घेत आपल्या हद्दीतील उड्डाणपुलाच्या भागाची उभारणी केली. त्यासाठी रेल्वेचे तब्बल नऊ कोटी रुपये खर्चही झाले, पण रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल बांधून दोन वर्षे उलटूनही पालिकेकडून या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे काम सुरूही झालेले नाही. त्यामुळे रेल्वेच्या परिचालनातील अडचणी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रलंबित आहे.

आता दोन आठवडय़ांपूर्वी रेल्वेने कळवा-मुंब्रा यांदरम्यान असलेल्या खारेगाव येथील रेल्वे फाटक बंद करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी विशेष ब्लॉकही घेण्यात आला. हा उड्डाणपूल उभारण्यासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यापैकी साडेआठ कोटी रुपये रेल्वे खर्च करणार आहे, तर उर्वरित खर्च व बांधकाम ठाणे महापालिका करणार आहे. रेल्वेने गर्डर उभारण्याचे काम पूर्ण करूनही ठाणे महापालिकेच्या बाजूने अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. रेल्वेच्या हद्दीतील या पुलाचे बांधकाम मार्च २०१७पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले. असे असले, तरी महापालिकेने अद्याप कोणतीही तयारी केली नसल्याने प्रत्यक्ष उड्डाणपूल पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल, याबाबत शंका आहे.

या दोन्ही उड्डाणपुलांबाबत मध्य रेल्वेने दोन्ही महापालिकांशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. प्रत्येक व्यासपीठावर रेल्वे पालिका अधिकाऱ्यांसमोर आपले मुद्दे मांडते. पण प्रवासी सुरक्षेच्या आणि रेल्वेच्या वक्तशीरपणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या दोन्ही उड्डाणपुलांसाठी अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. रेल्वेने मात्र या दोन्ही उड्डाणपुलांसाठी आतापर्यंत साधारण १७ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि हे दोन्ही पूल तसेच लटकत्या अवस्थेत पडून आहेत, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

फाटकांचा फटका

पश्चिम रेल्वेने उपनगरीय क्षेत्रातील बहुतांश रेल्वे फाटके बंद करून लोकांना केव्हाच पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मध्य रेल्वेवर मात्र अजूनही ठाकुर्ली, दिवा, शहाड, कळवा या चार ठिकाणच्या रेल्वे फाटकांचा फटका रेल्वेच्या वाहतुकीला बसत आहे. या रेल्वे फाटकांमुळे दर दिवशी किमान ५० पेक्षा जास्त फेऱ्यांना विलंब होतो आणि हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या फाटकांचा निकाल तातडीने लावण्याची गरजही रेल्वे अधिकारी व्यक्त करतात.