मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांसह १० सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई

लोकलमधील अपंगांच्या राखीव डब्यात घुसखोरी करणाऱ्यांमध्ये रेल्वेचे कर्मचारीही आघाडीवर आहेत. घुसखोरांविरोधात गेल्या १५ दिवसांत केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेल्या १० सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये मध्य रेल्वेचे विविध विभागातील आणि रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचारीही असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले. आतापर्यंत खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांविरोधातही कारवाई करताना ५३ जणांना पकडल्याची माहिती दिली.

लोकलमधील अपंगांच्या राखीव डब्यात सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. तरीही अनेक जण बिनदिक्कतपणे घुसखोरी करतात. गर्दीच्या वेळी तर हे प्रमाण खूपच मोठे असते. त्यामुळे अपंग प्रवाशांना सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवास करताना बराच मनस्ताप होतो. सामान्य प्रवाशांकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने २५ जुलैपासून कारवाईला सुरुवात केली आहे. यामध्ये खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करताना त्यांनी केलेल्या गुन्ह्य़ांची माहितीही पाठवली जात आहे. पहिल्या पाच दिवसांत ३४ जणांवर कारवाई केल्यानंतर त्यात आता आणखी वाढ झाली आहे. आतापर्यंत ५३ जणांवर दंडात्मक कारवाई करून नोटीसही धाडल्याचे सांगितले.

अपंगांच्या डब्यात घुसखोरी करण्यात सरकारी कर्मचारीही आघाडीवर आहेत. १० कर्मचाऱ्यांनाही पकडण्यात आले असून यामध्ये शहर पोलीस, रेल्वे पोलीसही असून मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या कर्मचाऱ्याने केलेल्या गुन्ह्य़ाची माहिती सुरक्षा दलाने दिली आहे. रेल्वे पोलिसांमध्ये लोहमार्ग पोलीस व मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलातील कर्मचारीही असल्याचे समोर आले. त्यांच्याविरोधातही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

ठाण्यात ४९० जणांवर कारवाई

दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, मानखुर्द, वडाळा, पनवेल, कर्जत स्थानकात लोकल येताच अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या घुसखोरांना पटकन उतरवण्यात येत आहे. त्यांच्याकडे विचारपूस करून व सर्व माहिती घेऊनच पुढील कारवाई केली जात आहे. २५ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत केलेल्या कारवाईत १,२३२ जणांना पकडण्यात आले आहे. यात सर्वाधिक ठाणे स्थानकात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ४९० आणि त्यापाठोपाठ घाटकोपर स्थानकात ४०१ जणांवर कारवाई झाली आहे.

सवलत पास आवश्यक

अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना काही जण डॉक्टरचे सर्टिफिकेटही जवळ बाळगत नाहीत. अपंग प्रवाशासोबत त्याच्या सहकाऱ्यालाही अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी रेल्वेकडून सवलत पास दिला जातो. जर तो सोबत नसेल तरीही कारवाई केली जाणार असल्याचे सुरक्षा दलाने स्पष्ट केले आहे.