News Flash

रेल्वेमार्गालगतची इमारत जमीनदोस्त

पाडकामात रेल्वे प्रशासनाचा असहकार; लोकल गाडय़ांमुळे इमारतीला हादरे

पाडकामात रेल्वे प्रशासनाचा असहकार; लोकल गाडय़ांमुळे इमारतीला हादरे

अवघ्या तीन महिन्यांत लोखंडी कांबीच्या मदतीने केशवजी नाईक मार्गावर उभारण्यात आलेली ११ मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यास महानगरपालिकेला सात महिने लागले. आजूबाजूच्या इमारती खेटून उभी राहिलेली ही इमारत रेल्वे रुळांना लागून असल्याने सुरक्षित जाळ्या लावून हे बांधकाम पाडावे लागले. यासाठी रेल्वेकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

बी विभागात भेंडीबाजार परिसरात येणाऱ्या केशवजी नाईक मार्गावर चार मजली इमारत होती. २००५ मध्ये ती पाडली गेली. २०१५ पर्यंत या भागात कोणतेही बांधकाम करण्यात आले नाही. मात्र त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत बाजूच्या दोन्ही इमारतींना खेटून येथे चक्क ११ मजली अनधिकृत इमारत उभी राहिली. या इमारतीच्या खाली तळघरही बांधण्यात आले. लोकल गाडय़ांमुळे या इमारतीला हादरेही बसत होते.

इमारत प्रस्ताव विभाग तसेच विधि खात्याने ही इमारत अनधिकृत व पालिकेच्या परवानगीशिवाय बांधली असल्याचे न्यायालयात सिद्ध केले. स्थगितीचे आदेश रद्द झाल्यानंतर अनधिकृत इमारत मोकळी करून ती पाडण्याचे काम ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र इमारतीच्या पाचव्या, सहाव्या व सातव्या मजल्यावरील घरातील रहिवासी जागा सोडून जाण्यास तयार नव्हते. पालिकेने इमारत पाडण्यासाठी नेलेल्या कामगारांच्या मदतीने त्यांचे सामान बाहेर काढून ठेवले व इमारत पाडण्याची कारवाई सुरू केली. मात्र दोन्ही बाजूला इमारती व मागे रेल्वेवाहतूक या स्थितीत हे बांधकाम पाडणे जिकिरीचे ठरले.

रेल्वेकडून परवानगी मिळवण्यात झालेला विलंब व स्थानिक कंत्राटदारांनी काम करण्यास लावलेला उशीर यामुळे पाडकाम करण्यास वेळ लागला. अखेर सात महिन्यांनंतर, शुक्रवारी इमारत पूर्ण जमीनदोस्त करण्यात पालिकेला यश आले. बी विभागाचे साहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी याप्रकरणी पुढाकार घेत कारवाई पूर्ण केली. या कारवाईत रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही आर्थिक सहकार्य मिळाले नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:17 am

Web Title: mumbai railway construction demolished
Next Stories
1 रोजगार वाढीसाठी शिकाऊ उमेदवारांच्या धोरणात बदल
2 मेट्रो-३ चा डेपो नियोजित जागीच
3 वर्षभरात अवघ्या अडीच हजार नव्या घरांची विक्री
Just Now!
X