मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी कामे करण्यात येणार असल्याने रविवारी दिवा ते कल्याण दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेमार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार असून याचा परिणाम लोकल रेल्वेगाडय़ांबरोबरच लांब पल्ल्यांच्या गाडय़ांवरही होणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर मात्र, शनिवारी मध्यरात्र ते रविवारी पहाटेदरम्यान ओव्हरहेड यंत्रणा आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरूस्ती-देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने रविवारी दिवसा कुठलाही ब्लॉक असणार नाही.

  • मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

कुठे : दिवा ते कल्याण डाऊन जलद मार्ग

कधी : सकाळी १०.३० ते दुपारी ३.००

परिणाम : मेगाब्लॉकमुळे सकाळी ९.३८ पासून ते दुपारी २.२५ वाजेपर्यंत सीएसटीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा आपल्या निर्धारित स्थानकांबरोबरच घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. ठाणे स्थानकातून या गाडय़ा डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील. या गाडय़ा सर्व स्थानकांवर थांबतील. तर सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या अप जलद लोकल गाडय़ा सकाळी १०.४६ ते दुपारी ३.१८ पर्यंत निर्धारित स्थानंकाबरोबर मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. परिणामी दोन्ही दिशेच्या गाडय़ा निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. तर, अप आणि डाऊन मार्गावरील गाडय़ा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत १० मिनिटे उशीराने धावतील.

  • हार्बर रेल्वे

कुठे : कुर्ला-वाशी दरम्यान अप व डाऊन मार्ग

कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०

परिणाम : मेगाब्लॉकमुळे सकाळी १०.४१ पासून ते दुपारी ३.०३ वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी दरम्यान  अप आणि डाऊन दोन्ही दिशांच्या गाडय़ांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या काळात सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष गाडय़ा सोडण्यात येतील. मेगाब्लॉक दरम्यान सकाळी १० पासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंतर हार्बरच्या प्रवाशांना मेन लाईनवरून आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

लोकल बिघाडांची जंत्री

  • ९ ऑगस्ट : ठाणे आणि कळवा यांदरम्यान लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत.
  • ८ ऑगस्ट : विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ सकाळी दहाच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली.
  • ३० जुल : मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या सर्वच मार्गावरील वाहतूक मुसळधार पावसामुळे उशिराने सुरू होती. ट्रान्स हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम.
  • २६ जुल : पारसिक बोगद्याजवळ सिंहगड एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने सकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कोलमडली.
  • १९ जुल : अंबरनाथ-बदलापूर यांदरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने आणि मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे व हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत.
  • १३ जुल : कल्याण-ठाकुर्ली दरम्यान पेण्टोग्राफवर कुत्रा पडल्याने विद्युतपुरवठा खंडित. रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम.
  • ११ जुल : कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या गाडीच्या दोन डब्यांमधील कपिलग पारसिक बोगद्याजवळ तुटल्याने ३० सेवा रद्द, ८० सेवांवर परिणाम.
  • ७ जुल : उद्यान एक्सप्रेसचे इंजिन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मशीद या स्थानकांदरम्यान रूळांवरून घसरून वाहतूक कोलमडली. ७० हून अधिक सेवा रद्द.
  • २९ जून : ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि ऐरोली यांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने पाच तास सेवा ठप्प. ३५ सेवा रद्द.
  • २१ जून : पावसाचे पाणी साचल्याने तसेच दादर स्थानकात मांडवी एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची सेवा सकाळच्या वेळात कोलमडली. त्यातच पारसिक बोगद्यावरील संरक्षक िभत कोसळल्याने दुपारी दीड ते सायंकाळी पाच या काळात वाहतूक बंद. २५३ सेवा रद्द.
  • १९ जून : पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातील बॅटरी चोरीला गेल्याने दीड तास पश्चिम रेल्वे ठप्प. ६० सेवा रद्द.
  • २६ मे : मध्य रेल्वेवर २५ मे रोजी झालेल्या बिघाडाचा परिणाम असल्याने सकाळच्या वेळेत सेवा विस्कळीत. ६० सेवा रद्द.
  • २५ मे : विक्रोळी स्थानकाजवळ ट्रान्सफॉर्मर जळल्याने सिग्नल यंत्रणा निकामी. ३००हून अधिक सेवा रद्द.