पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेवर अप जलद मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. या दरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप जलद मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने धावतील. डाऊन जलद मार्गावरील लोकल गाडय़ांना सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ या वेळेत घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडय़ा निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.२० ते ३.४८ पर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरिवली ते नायगाव स्थानकादरम्यान जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान  विरार-वसई ते बोरिवली-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक अप व डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल.