अप व डाऊन धिम्या मार्गावर दुरुस्ती व देखभाल; काही गाडय़ा रद्द

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी (२६ ऑगस्ट) मध्यरात्री ते रविवार पहाटेपर्यंत रात्रीचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही उपनगरी गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही सुटण्याच्या स्थानकात बदल करण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत मुंबईकडे येणाऱ्या व मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ा दहा ते वीस मिनिटे उशिराने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर मात्र दिवसाचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेने कळविले आहे.

मध्य रेल्वे

  • कधी- शनिवार, रात्री १२-५० ते सकाळी ६-०५ पर्यंत.
  • कुठे- मुलुंड ते कळवा दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर
  • परिणाम – शनिवारी मध्यरात्री १२-३४ ते सकाळी ६-१० या वेळेत मुलुंड ते दिवा दरम्यान सर्व गाडय़ा डाऊन जलद मार्गावर तर पहाटे ३-४८ ते सकाळी ५-५३ दरम्यान दिवा ते मुलुंडदरम्यान सर्व गाडय़ा अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. या कालावधीत कळवा व मुंब्रा स्थानकांवर अप व डाऊन धिम्या मार्गावर गाडय़ा थांबणार नाहीत.

रद्द केलेल्या उपनगरी गाडय़ा

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी रात्री १२-३४ वाजता सुटणारी ठाणे उपनगरी गाडी
  • रविवारी सकाळी ६-३२ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणारी डोंबिवली उपनगरी गाडी
  • रविवारी सकाळी ६-४८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी ठाणे उपनगरी गाडी
  • रविवारी सकाळी ७-१६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डोंबिवली उपनगरी गाडी
  • शनिवारी रात्री ९-२० वाजता कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी उपनगरी गाडी रद्द करण्यात आली आहे.
  • शनिवारी रात्री ११-३९ आणि ११-५९ कल्याण येथून ठाणेकरता सुटणाऱ्या उपनगरी गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

अंशत: रद्द केलेल्या उपनगरी गाडय़ा

  • शनिवारी रात्री १०-२४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणला जाणारी उपनगरी गाडी कुर्ला स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे.
  • शनिवारी रात्री ११-३९ व ११-५९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज येथून ठाणेकरता सुटणाऱ्या उपनगरी गाडय़ा कुर्ला स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत. पहाटे ४-४४ वाजताची कुर्ला-अंबरनाथ उपनगरी गाडी मुंब्रा येथून अंबरनाथकडे रवाना होईल.
  • ५-४७ ची ठाणे ते आसनगाव उपनगरी गाडी कल्याण ते आसनगाव अशी चालविली जाणार आहे.
  • ब्लॉक कालावधीत मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा दहा ते वीस मिनिटे उशिराने धावतील.