लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे मेगाब्लॉकमुळे हाल
महाराष्ट्र दिनाची सुटी, त्यानिमित्ताने असलेले अनेक सरकारी कार्यक्रम, यंदाच्या मोसमातील लग्नाचा शेवटचा मुहूर्त अशा अनेक कारणांमुळे मुंबईकर रविवारी बाहेर पडले खरे; पण मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर असलेल्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सार्वजनिक सुटीच्या दिवशी मेगाब्लॉक घेऊ नये, अशी मागणी मुंबईकरांकडून वारंवार होत असतानाही देखभाल दुरुस्तीत रेल्वे हयगय करू शकत नसल्याने पुन्हा एकदा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पश्चिम रेल्वेने माहीमजवळ घेतलेला ब्लॉक एक तास जास्त चालल्याने हार्बर प्रवाशांच्या हालअपेष्टांमध्ये भर पडली.
३० एप्रिल आणि १ मे हे यंदाच्या मोसमातील लग्नाचे शेवटचे मुहूर्त होते. त्यानिमित्ताने एसटी महामंडळाने विशेष गाडय़ाही सोडल्या होत्या. पण उपनगरीय रेल्वेला हा शहाणपणा दाखवता आला नाही आणि त्यांनी रविवारी नेहमीप्रमाणेच मेगाब्लॉकचे आयोजन केले. रविवारी मध्य रेल्वेतर्फे माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर, सीएसटी ते चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. मुख्य मार्गावरील मेगाब्लॉकमुळे या मार्गावरील गाडय़ा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. तर हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे त्या मार्गावरील गाडय़ा कुल्र्यापुढे मुंबईच्या दिशेने येत नव्हत्या. याच दरम्यान पश्चिम रेल्वेवर सफाळे आणि वैतरणा यांदरम्यान पुलाचे गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे डहाणूकडे जाणाऱ्या गाडय़ा रद्द होत्या. तसेच पश्चिम रेल्वेने माहीमजवळ हार्बर मार्गावर ब्लॉक घेतल्याने सीएसटी ते अंधेरी/वांद्रे यांदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यातच हा ब्लॉक नियोजित वेळेपेक्षा एक तास जास्त चालल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये आणखीनच भर पडली.
लग्नाचे मुहूर्त गाठण्यासाठी साडेदहा अकराच्या सुमारास प्रवासासाठी निघालेल्या मुंबईकरांना या तिहेरी मेगाब्लॉकचा सामना करावा लागला. ब्लॉकदरम्यान अनेक सेवा रद्द असल्याने गाडय़ांना गर्दी होती. त्यातच गाडय़ांची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने चालू असल्याने या गर्दीत भर पडत होती.
दादर, घाटकोपर, अंधेरी, ठाणे, डोंबिवली अशा महत्त्वाच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म गर्दीने फुलले होते. इतर दिवशी सकाळच्या वेळी मुंबईकडे येणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईहून निघणाऱ्या गाडय़ांना गर्दी असते. रविवारी मात्र एकाच वेळी दोन्ही बाजूंना जाणाऱ्या गाडय़ांना गर्दी होती.

प्रवाशांच्या विनंतीकडे दुर्लक्ष
सार्वजनिक सुटय़ांच्या दिवशी मेगाब्लॉक घेतले जाऊ नयेत, अशी विनंती रेल्वेला अनेकदा करण्यात आली आहे. मात्र देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वे नेहमीच ही विनंती अव्हेरत आली आहे. रेल्वेने प्रवाशांच्या हालअपेष्टांकडे लक्ष देऊन सुटय़ांच्या दिवशी ब्लॉक घेणे टाळावे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.