भायखळा स्थानकाच्या सुशोभीकरणाचा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ   

मध्य रेल्वेवरील नऊ, तर पश्चिम रेल्वेवरील एका स्थानकाचा कायापालट करण्याबरोबरच १६६ वर्षे जुन्या भायखळा स्थानकाला गतवैभव मिळवून देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे या स्थानकांमध्ये प्रवाशांना प्रसन्न वातावरण अनुभवता येईल, शिवाय तेथील सोयी-सुविधांमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

भायखळा स्थानकाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. त्यावेळी त्यांनी मुंबईकर प्रवाशांचा लोकलप्रवास जास्तीतजास्त सुसह्य़ करण्याची आणि त्यांच्या गैरसोयी दूर करण्याची ग्वाही दिली.

भायखळा स्थानकासह सीएसएमटी, कुर्ला, मुंब्रा, ठाणे, डोंबिवली, आंबिवली, वाशिंद, चुनाभट्टी, निळजे आणि पश्चिम रेल्वेवरील चर्नीरोड स्थानकाचेही सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ होईल, अशी माहिती गोयल यांनी दिली. या स्थानकांचे काम सामाजिक उत्तरदायित्व निधीतून खासगी कंपन्यांमार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  रेल्वेमंत्र्यांनी

भायखळा स्थानकाची पाहणी केल्यानंतर प्रवाशांशी संवादही साधला.  भायखळा स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम भाजप नेत्या आणि ‘आय लव्ह मुंबई’ संस्थेच्या प्रमुख शायना एन. सी. आणि बजाज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टमार्फत केले जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वे आणि संस्थेत सामंजस्य करारही करण्यात आला. येत्या आठ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

देशभरातील रेल्वे पादचारी पूल, रेल्वेच्या अखत्यारितील उड्डाणपूल आणि रेल्वे पुलांवर त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती प्रदर्शित करण्यात येणार असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. सीएसएमटी स्थानकाला जोडणारा हिमालया पूल कोसळल्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील काही पुलांवर त्यांच्याबद्दलची तपशीलवार माहिती प्रदर्शित करण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

अंध, अपंगांनी मांडली व्यथा

कार्यक्रमावेळी अपंगांच्या शिष्टमंडळाने गोयल यांची भेट घेतली. अपंगांच्या डब्यात सामान्य प्रवाशीही चढत असल्याने त्यावर कारवाईची मागणी केली. या कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनील कुमार जैन, अतिरिक्त महाव्यवस्थापक डॉ. आर. बद्री नारायण आदी उपस्थित होते.

भायखळा स्थानकाचा कायापालट असा..

हे स्थानक १८५३ मध्ये बांधण्यात आले होते. त्याचे लाकडी फलाट १८५७ मध्ये बदलून दगडी इमारत बांधण्यात आली. या स्थानकाची पुनर्बाधणी १८९१ मध्ये करण्यात आली. आजपर्यंत तीत बदल केलेला नाही. त्याचा कायपालट करताना त्याचे मूळचे रूप त्याला पुन्हा मिळवून देण्यात येणार आहे. छतावरील प्लास्टिक आणि लोखंडी पत्रे काढून मंगळुरी कौले टाकली जातील. ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीच्या आद्याक्षरांचेही जतन केले जाईल.

५५ हजार कोटींच्या प्रकल्पांपैकी ३३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यापैकी काही कामे लवकरच सुरू होतील.    – पीयूष गोयल, रेल्वेमंत्री

स्थानके सजणार, गैरसोयी दूर होणार

  • फलाटांवरील प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण
  • स्थानकांमध्ये एलईडी दिव्यांची रोषणाई
  • पादचारी पूल, स्थानकातील भिंतींनाही रंगरंगोटी. नवी स्वच्छ प्रसाधनगृहे
  • स्थानकांवरील आसनव्यवस्था उत्तम दर्जाची. स्थानकाजवळ वाहनतळ