मुंबईत सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं. रेल्वेसोबत रस्ते वाहतुकही ठप्प झाल्याने अनेकजण अडकून पडले होते. सकाळपासूनच मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा पुर्णपणे ठप्प असल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. अनेकांनी सुट्टी घेत घरीच थांबणं पसंत केलं. राज्य सरकारनेही सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावासमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. दरम्यान मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असून सखल भागांत साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांसह विरोधकांनीही महापालिकेच्या कारभारावर यथेच्छ टीका केली. मात्र महापालिकेने मुंबई परिसरात साचलेलं १४ दशलक्ष लीटर पाणी समुद्रात सोडल्याचा दावा केला आहे.

मुंबई महापालिकेने ट्विटर अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत देण्यात आलेल्या माहितीनुसार, सहा पम्पिंग स्टेशनच्या सहाय्याने १४ हजार दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाणी समुद्रात सोडून देण्यात आलं आहे. यावेळी महापालिकेने समुद्रात सोडण्यात आलेल्या पाण्याची क्षमता तुलसी आणि विहार तलावातील एकत्रित क्षमतेपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं आहे.

मात्र महापालिकेने इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी समुद्रात सोडण्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेकडे पाणी साठवण्याचीही कोणतीही सुविधा उपलब्ध नसण्यावरुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

तंत्रज्ञानाचा इतका विकास झाला असतानाही अद्याप आपल्याकडे पावसाचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. यामधून राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत असल्याचं काहींनी म्हटलं आहे.