News Flash

Mumbai Rain : मुंबईत पाऊसतांडव

विविध दुर्घटनांमध्ये ३३ जणांचा मृत्यू

विविध दुर्घटनांमध्ये ३३ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले.

चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील डोंगरावर वसलेल्या न्यू भारत नगर या झोपडपट्टीवर भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. तसेच विक्रोळीतील सूर्य नगर येथील पंचशील चाळीतील सहा घरांवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळून १० नागरिकांनी जीव गमावला आणि पाच जण जखमी झाले. भांडुपच्या महाराष्ट्र नगर परिसरातील अमर कौर विद्यालायाशेजारील घराची भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अंधेरी आणि पोयसर येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. अंधेरीतील फिरदोस बेकरीचा मालक असलेल्या तरुणाचा दुकानातील साहित्य वाचवताना विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला, तर पोईसर येथील घटनेत एक जण दगावला. वांद्रे रेक्लेमेशन येथे ४५ वर्षांच्या एका महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

मुंबई आणि उपनगर परिसरात शनिवारी दिवसभर ऊन होते. पावसाची फारशी चिन्हे दिसत नव्हती; परंतु रात्री ११ वाजता चित्र बदलले. शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री १२ वाजल्यानंतर पावसाने रौद्ररूप धारण केले. १२ ते २ या वेळेत मुंबईच्या सर्वच भागांत अतिमुसळधार पाऊस कोसळला, तर काही भागांत अतिवृष्टी झाली. मध्यरात्री दीड ते दोन तासांत अनेक भागांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान,  मुंबई, ठाणे, पालघर येथे काही ठिकाणी सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हिंदमाता, सायन रोड नं. २४, गांधी मार्के ट, वडाळा चर्च, सक्कर पंचायत चौक, नायर रुग्णालय परिसर, वडाळा संगमनगर, मडके बुवा चौक , वरळी, ग्रँटरोड, नाना चौक या भागांत पाणी साचले, तर पूर्व उपनगरात शीतल चित्रपटगृह, शेल कॉलनी, आरसीएफ वसाहत, अंजनाबाई नगर, अणुशक्ती नगर, कु र्ला आगार, शेरे पंजाब कॉलनी, मानखुर्द रेल्वे स्थानक, नेहरू नगर, स्वस्तिक चेंबर, कल्पना सिनेमा, टेंबी ब्रिज हे भाग जलमय झाले. पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज, साईनाथ सबवे, मिलन सबवे, अंधेरी सबवे, अंधेरी मार्के ट, दहिसर सबवे, वांद्रे टॉकीज, वीरा देसाई रोड अंधेरी, वाकोला पूल, गोरेगाव बेस्ट वसाहत येथे पाणी साचले.

सर्वाधिक पाऊस दहिसरमध्ये

मुंबईतील सर्वच भागांत दीडशे मिमीहून अधिक पाऊस पडला, तर काही भागांत २०० मिमीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस दहिसरमध्ये पडला.

दहिसर – २४५.८४ मिमी

चेंबूर – २४१.०५ मिमी

विक्रोळी पूर्व – २३७.९८ मिमी

कांदिवली – २३२.४१ मिमी

मरोळ – २२८.८५ मिमी

मुलुंड – २२७.५५ मिमी

सीएसएमटी स्थानक परिसर – २२२.७४ मिमी

बोरिवली – २२२.२३ मिमी

वरळी – २२१.७१ मिमी

चेंबूरमधील मृतांची नावे

१.     मीना सूर्यकांत झिमुर (४५)

२.     सूर्यकांत रवींद्र झिमुर (४७)

३.     अपेक्षा सूर्यकांत झिमुर (२०)

४.     पंडित गोरसे (५०)

५.     छाया पंडित गोरसे (४७)

६.     प्रतिलेशा पंडित गोरसे (१८)

७.     प्रांची पंडित गोरसे (१५)

८.     पल्लवी दुपारगडे (४४)

९.     गौतम पारधे (४५)

१०. शिला गौतम पारधे (४०)

११. शुभम गौतम पारधे (१०)

१२. श्रुती गौतम पारधे (१५)

१३. मुकेश जयप्रकाश अग्रहारी (२५)

१४. अर्जुन अग्रहारी (२६)

१५. देवांश अग्रहारी (४)

१६. जयप्रकाश अग्रहारी (६०)

१७. जिजाबाई तिवारी (५४)

१८. ऊर्मिला ठाकूर (३२)

१९. खुशी ठाकूर (२)

चेंबूरमधील जखमींची नावे

संजय गायकवाड (४०) –

विजय खरात (४०)

अक्षय सूर्यकांत झिमूर (२६)

लक्ष्मी आबाजी गंगावणे (४०)

विशाखा गंगावणे (१५)

विक्रोळीतील मृतांची नावे

१.     अंकित रामनाथ तिवारी (२३)

२.     रामनाथ तिवारी (४५)

३.     कविता रामनाथ तिवारी (४२)

४.     आशीष विश्वकर्मा (१९)

५.     प्रिन्स हंसराज विश्वकर्मा (११)

६.     किरणदेवी विश्वकर्मा (४५)

७.     पिकी हंसराज विश्वकर्मा (१५)

८.     कल्पना जाधव (३५)

९.     साहेबराव जाधव (४४)

१०. कमलेश यादव (४५)

जखमी

राजू दुबे (४०) – महात्मा फुले रुग्णालय

आजही अतिवृष्टीचा इशारा

पुणे : किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणात सर्वच ठिकाणी धुवाधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात सोमवारीही (१९ जुलै) अतिवृष्टीची शक्यता आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाख

चेंबूर, विक्रोळीसह विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या मदतीची व जखमींवर मोफत उपचाराची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के ली. मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी आपत्तींचा सामना करण्यासाठी दक्ष राहावे आणि दरडग्रस्त भाग व मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून सुरक्षितस्थळी हलवा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी प्रशासनाला दिला.

२४ तासांतील मिमी पाऊस

१७६.९६ शहर

२०४.०७  पूर्व उपनगरे

१९५.४८  पश्चिम उपनगरे

रेल्वे विस्कळीत

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानके  जलमय झाली. त्यामुळे रविवारी कामावर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांपाठोपाठ एक्स्प्रेस गाडय़ांच्या प्रवाशांना मोठा फटका बसला. मुंबईतून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळा बदलतानाच बाहेरगावाहून येणाऱ्या गाडय़ाही मुंबईत पोहोचल्याच नाहीत.

रात्र पावसाची.. पावसाने शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे २ दरम्यान धुमाकूळ घालत शहर आणि उपनगराला झोडपून काढले. सखल भागांत, बैठय़ा घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले. झोपडपट्टय़ा जलमय झाल्या. पहाटे ३ वाजल्यानंतर पावसाने थोडी उसंत घेतली, परंतु पाणी ओसरेपर्यंत अनेक ठिकाणच्या रहिवाशांना घरात साचलेल्या पाण्यात रात्र जागून काढावी लागली.

कुटुंबे नष्ट :  चेंबूर आणि विक्रोळी दुर्घटनांमध्ये काही कुटुंबांतील सर्वाचा मृत्यू झाला आहे, तर काही कुटुंबांतील एक मूल बचावले आहे. आई-वडील-भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे काही मुले निराधार झाली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 4:00 am

Web Title: mumbai rain 33 killed in rain related incidents in mumbai zws 70
Next Stories
1 पालिकेचा मुंबईकरांच्या जिवाशी खेळ-शेलार
2 यंत्रणांकडून आपत्तीपूर्व दक्षता आवश्यक!
3 वातावरणीय बदलांमुळे मुंबईत वादळी पाऊस