मुंबईत दाखल झालेला मान्सून आपलं रौद्ररुप दाखवत असतानाच आता मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

समजून घ्या- रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

हेही वाचा – पावसाचं धुमशान, मुंबई तुंबली! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेला ‘ब्रेक’

मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

आणखी वाचा- Mumbai Rains: सेंट्रल आणि हार्बर लाईनवरच्या या लोकल रद्द, बेस्टचेही मार्ग वळवले!

पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी, चुनाभट्टी ते सायन आणि कुर्ला परिसरात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे वाहतूक १०:२० वाजेपासून, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक ११:१० वाजेपासून थांबवण्यात आली होती. ठाणे ते कर्जत/कसारा आणि मानखुर्द ते पनवेल लोकल वाहतूक सुरू आहे. ट्रान्स हार्बर आणि बीएसयू (उरण) रेल्वे मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.