मुंबईत मागील ४८ तासांहून अधिक काळ पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे वाहतूक आणि सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. ही स्थिती लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आजच्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आज होणार होत्या त्या रद्द करण्यात आल्या आहे. लवकर परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आज होणार आहेत,त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल’.

शाळा आणि महाविद्यालयात जाताना विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नयेत यासाठी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पाऊस कोसळत असल्याने सर्वच ठिकाणच्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. लोकल धिम्या गतीने धावत आहेत तर रस्त्यांवरही पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.