दोन-तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. गुरूवारी परतलेल्या पावसाने मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढलं. ठाणे, नवी मुंबई, वसई आणि पालघर येथे जोरदार सरींमुळे पाणी साचून रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर तर नवी मुंबई, ठाणे आणि पश्चिम उपनगरांत पावसाचं रौद्ररूप बघायला मिळालं. गुरुवापासून पावसाचा जोर काय असून, शुक्रवारी सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्येही पावसाने जोर पकडला असून, आज (१८ जून) मुंबई मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाने पुन्हा दमदार पाऊल ठेवलं असून, गुरूवारी मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून, गुरूवारी बरसलेल्या सरींनी सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा- तुफान पाऊस! उपनगरांत दिवसभर मुसळधार; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, ठाणे, पालघर, रायगड या शेजारच्या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याबरोबर औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशिम याठिकाणीही पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पंचगगेच्या खोऱ्यात पुन्हा पूरपरिस्थिती उद्भवण्याची भीती

कोल्हापूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ५३ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून, काही मार्गावरील वाहतूकदेखील पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत गेल्या २४ तासात १७ फुटांनी वाढ झाल्याने, नदीतील मंदिरं आता पाण्याखाली गेली आहेत.

हेही वाचा- पुणे शहरात दिवसभर पावसाची रिपरिप; ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद

कृष्णेच्या पाणीपातळीतही वाढ

कोल्हापूरबरोबरच सांगली जिल्ह्यातही दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे. कृष्णेच्या पाणीपातळीत सध्या १५ फूट वाढ झाली असून, त्यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आव्हान केलं आहे.