जूनपासून दिवसाकाठी ६० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला तेव्हा अनेक भागांत पाणी साठले. सुरुवातीला पाणी कुठे भरले, ते आपत्कालीन विभागाकडून सांगितले जात असे. मात्र त्यामुळे आपलाच दावा खोटा पडतो आहे हे कळल्यावर वरिष्ठांकडून सूत्रे हलवण्यात आली आणि पाणी तुंबल्याच्या ठिकाणांऐवजी ‘निरंक’ या शब्दाने जागा घेतली. मात्र कोंबडा झाकला तरी उजाडायचे राहत नाही.

१६ जुल ते २९ ऑगस्ट. एक गोष्ट आधीच मान्य करूया की २९ ऑगस्टला भरपूर पाऊस पडला. दिवसभरात म्हणजे २४ तासांमध्ये ६० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला की तो मुसळधार या श्रेणीत येतो. मंगळवारी, दुपारी अडीच ते साडेपाच वाजेपर्यंतच्या तीन तासांत १७१ मिलिमीटर पाऊस पडला. बुधवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये ३१६ मिमी. पाऊस झाला. मागील ४० वर्षांतील हा सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे. २६ जुलच्या विक्रमी ९४४ मिमी. पावसानंतर गेल्या १२ वर्षांत एवढा पाऊस झाला नव्हता. मात्र ही सर्व वस्तुस्थिती गृहीत धरल्यावरही जागतिक आíथक केंद्र असलेली मुंबई तुंबली, संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली, लाखो लोक पुरात अडकले, शेकडो वस्तीत पाणी गेले, घरे, दुकानातील कोटय़वधी रुपयांच्या सामानाचे नुकसान झाले आणि त्याहून गंभीर म्हणजे आठ लोकांचे प्राण गेले. यासाठी केवळ नसíगक स्थितीला जबाबदार धरता येणार नाही. गेल्या वर्षी पाऊस पडूनही मुंबईत पाणी साठले नाही, अशी स्वत:चीच टिमकी वाजविण्यात महापालिका अधिकाऱ्यांजवळ पावसाकडे बोट दाखवण्यापलीकडे इतर कोणतेही उत्तर नाही. मग या न्यायाने गेल्यावर्षी पाणी न तुंबण्याचे श्रेयही बेताबेताने पडलेल्या पावसालाच द्यावे लागेल.

मुंबईचा धो धो पाऊस ही या महानगरीची ओळख आहे. तो कमी करणे मर्त्य मानवाच्या हातात नाही. मग केवळ दैवावर हवाला ठेवून भागणार का आणि तसे असेल तर मग आजवरच्या उपाययोजनांवर हजारो कोटी रुपये खर्च का केले? २६ जुल, २००५ ला आलेल्या महापुरात एक हजाराहून अधिक बळी गेले. असा पाऊस शतकातून एकदाच पडत असला तरी या पावसासाठी आपण सज्ज राहायला हवे याची जाणीव झाल्याने ९० च्या दशकात बनवल्या गेलेल्या ब्रिमस्टोवॅड या प्रकल्पाच्या फायलीवरची धूळ झटकण्यात आली. काय होते या प्रकल्प अहवालात? तासाला २५ मिलीमीटर पाऊस झाल्यास ते पाणी वाहून नेण्यासाठी ब्रिटिशकाळात भूमिगत पर्जन्यजलवाहिन्या टाकल्या होत्या. दरम्यानच्या काळात सिमेंट-काँक्रीटीकरण झाल्याने जमिनीतून पाणी झिरपण्याची क्षमता आणखी कमी झाली. त्यामुळे ताशी ५० मिमी पाऊस पडल्यास ते पाणी वाहून नेण्यासाठी नेमके काय करता येईल, ते या अहवालात मांडले गेले. त्यात आठ ठिकाणी पाणी उपसा करणारी केंद्रे बांधण्यासोबतच नाल्यांलगत पाच मीटर लांबीचा रस्ता, नाल्यांना संरक्षक िभती, गटार-नाल्यातील प्रवाहात अडथळे दूर करण्याबरोबरच त्यांची रुंदी व खोली वाढवणे, भूमिगत पर्जन्यजलवाहिन्यांचे जाळे रुंदावणे तसेच नाल्यांच्या काठावरील झोपडय़ांचे पुनर्वसन असे अनेक उपाय सुचवले होते. २६ जुलच्या हादऱ्यानंतर २००५ मध्ये यातील ५८ कामे हाती घेण्यात आली. केंद्राकडून १२०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. १२ वर्षांनंतर यातील केवळ २८ कामे पूर्ण झाली आहेत. नाल्यांचे रुंदीकरण हे झोपडय़ांच्या पुनर्वसनाच्या समस्येमुळे रेंगाळले आहे. त्यामुळे या प्रकल्पावरील आतापर्यंत झालेला साधारण २७०० कोटी रुपयांचा खर्च तसेच दरवर्षी दीडशे ते दोनशे कोटी रुपये देऊन केली जाणारी नालेसफाई यानंतरही मुंबईकरांच्या वाटेला आला तो २९ ऑगस्टचा पूर. नाल्यांमध्ये, गटारांमध्ये अडकलेला गाळ, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या यामुळे पाणी जाण्यास अडथळा येतो, हे २६ जुलनंतर २९ ऑगस्टला पुन्हा दिसले. समुद्राने आणि पावसाने मुंबईकरांनी टाकलेल्या कचऱ्याची परतफेड केली. िहदमातासारख्या सखल भागातील पाणी काढण्यासाठी सात किलोमीटर लांबीवरील ब्रिटानिका जलउपसा केंद्र अपुरे ठरते आहे, हे लक्षात आले. शहराच्या कोणत्याच भागात ताशी ५० मिमी पाऊस वाहून नेण्याची क्षमता असलेची यंत्रणा उभी करू शकलो नाही, यावर शिक्कामोर्तब झाले.

अर्थात २६ जुलनंतर चांगले काहीच घडले नाही का? गेल्या १२ वर्षांत पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने मोठी मजल गाठली आहे. अत्यंत कार्यक्षम म्हणून नावाजलेल्या या विभागाने मंगळवारी चोख कामगिरी बजावली. भर पुरात रस्त्यावर उतरलेले पालिकेचे हजारो कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन दलालाचेही कौतुक करावे लागेल. पुरानंतर साथीचे आजार पसरू नयेत यासाठी कीटकनाशक विभाग व आरोग्य विभागाकडून सुरू असलेले प्रयत्नही दाद देण्यासारखे आहेत. २६ जुलचा अनुभव असल्यानेच या यंत्रणा यावेळी संकटकाळात अधिक कार्यक्षमतेने काम करू शकल्या हे नाकारता येणार नाही. सामान्य मुंबईकरांनाही या पावसाचा अनुभव होताच. यात सर्वात मोठा वाटा उचलला तो मोबाइल या संपर्क यंत्रणेने. १२ वर्षांपूर्वी आपली माणसे नेमकी कुठे अडकली आहेत याचीच कल्पना नव्हती. २६ जुलनंतर भरतीच्या वेळा, पावसाचे प्रमाण याची कल्पना मुंबईकरांना आली. दोन दिवस पुरात अडकल्यानंतर काय काय समस्या येतात याचा अनुभव घेतल्यानेच सामान्य मुंबईकर कोणत्याही प्रशासकीय हाकेची किंवा यंत्रणेचा वाट न पाहता एकमेकांच्या मदतीला धावून आले. अगदी मध्यरात्री व पहाटेही हे मदतकार्य विनासायास सुरू होते. मात्र हे सर्व घडले ते पूर आल्यानंतर. मुंबईत पाणी साठू नये आणि पूर आलाच तर काय प्रतिबंधात्मक उपाय करावेत याबाबत यंत्रणा नापास ठरली हे मान्य करावे लागेल.

पाऊसच एवढा पडला की.. हे सत्य पालिका प्रशासन व राज्यकर्त्यांनी मुंबईकरांना पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. प्रशासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांपेक्षा सर्वसामान्य मुंबईकरांना या पावसाचा अधिक अनुभव आहे. संपूर्ण शहर तुंबले नाही तरी एका सरीत बंद पडणाऱ्या मध्य रेल्वेच्या ४० लाख प्रवाशांना या पावसाची चांगलीच कल्पना आहे. पाणी तुंबून बससह वाहतूक वळवावी लागते तेव्हा वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्यांना पाऊस कसा आहे, हे कळते. या पावसाळ्यात जूनपासून जेव्हाजेव्हा दिवसाला ६० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला तेव्हा तेव्हा शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साठले. सुरुवातीला पाणी कुठे भरले ते आपत्कालीन विभागाकडून सांगितले जात असे. मात्र त्यामुळे ‘शहर तुंबू न देण्याचा’ आपलाच दावा खोटा पडतो आहे हे कळल्यावर वरिष्ठांकडून सूत्रे हलवण्यात आली आणि पाणी तुंबल्याच्या ठिकाणांऐवजी ‘निरंक’ या शब्दाने जागा घेतली. तरी बरे, अजून केंद्र शासनाने हागणदारीमुक्तीप्रमाणे पूरमुक्ती योजना आणली नाही. नाहीतर ते प्रमाणपत्रही पटकावून पालिकेने जाहीर केले असते. कोंबडा झाकला तरी उजाडायचे राहत नाही. शहरातून प्रवास करणाऱ्यांना कमी पावसातही पाणी भरल्याचा अनुभव येत होता. वस्तुस्थिती लपवण्यापेक्षा कमी पावसातही पाणी का तुंबते आहे, यावर प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित २९ ऑगस्टला ओढवलेल्या भीषण परिस्थितीचे परिणाम कमी झाले असते.

prajakta.kasale@expressindia.com