रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी भरलं होतं. यामुळे चर्चगेट ते विरार लोकलसेवेला फटका बसला होता. पश्चिम रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र सध्या पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीत कोणताही अडथळा नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. नालासोपाऱ्यातील चारही ट्रॅकवरील पाण्याची पातळी खालावली असल्याचंही पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक अद्यापही ठप्प आहे. लवकरच ही सेवा सुरळीत केली जाईल असं सांगण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या वाहतुकीत कोणताही अडथळा नाही. चर्चगेट ते विरारदरम्यान वाहतूक सुरु आहे. नालासोपाऱ्यातील चारही लाइनवरील पाण्याची पातळी खालावली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असल्याने दृष्टीमानता कमी आहे. यामुळे तिथे लोकल धीम्या गतीने सुरु आहेत.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा सकाळी ठप्प झाली होती. दरम्यान रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली आहे. राज्य सरकारनेही सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावासमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे.