News Flash

Mumbai Monsoon : पावसाची दडीच!

मोसमी वारे मुंबईत दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर करूनही पावसाने दडीच मारली आहे

(संग्रहित छायाचित्र)

कोरडय़ा टप्प्यांचा परिणाम; कोकणात मात्र जोरदार सरी

खास प्रतिनिधी, मुंबई/ पुणे

मोसमी वारे मुंबईत दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर करूनही पावसाने दडीच मारली आहे. मोसमी वारे दाखल होऊनही असे कारडे टप्पे येत असतात. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या याचाच अनुभव येत आहे, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, पुढील तीन दिवसांत परिस्थितीत बदल अपेक्षित असून कोकणासह मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने आठवडय़ानंतर मोसमी वाऱ्यांचे प्रवाह बळकट होऊन राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळने मान्सूनचे प्रवाह रोखल्यानंतर सुमारे दोन आठवडय़ांच्या विलंबाने राज्यात दाखल झालेले मोसमी वारे सध्या जोमाने प्रवास करीत आहेत.

राज्यात दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवसांतच त्यांनी राज्य व्यापले आहे. २५ जूनला मोसमी वाऱ्यांनी राज्य व्यापल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. रत्नागिरी, महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस झाला. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. पुढील आठवडाभर कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात या कालावधीत काही ठिकाणी सरी कोसळतील. त्यानंतर या भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

सध्या मोसमी वाऱ्यांनी गुजरातपर्यंत मजल मारली आहे. मोसमी वारे दाखल होऊनही राज्याच्या बहुतांश भागांत जोरदार सरी बरसत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ही स्थिती कायम राहणार नाही. आठवडय़ामध्ये मोसमी वाऱ्यांचे प्रवाह बळकट होऊन चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

विलंबास कारण..

कोकण विभाग वगळता राज्यात सर्व ठिकाणी आठवडाभर काही ठिकाणीच सरी कोसळणार आहेत. या ठिकाणी मोसमी पावसाचा अंशत: खंड असणार आहे. मोसमी वाऱ्यांचे पाच टप्पे असतात. यंदा मोसमी वारे राज्यात उशिराने दाखल झाले. त्याचे प्रवाह कमजोर असल्याने राज्यात काही भागांत पावसाचा खंड पडणार आहे. कोकण आणि सह्य़ाद्रीच्या पूर्व उताराच्या प्रदेशावर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र जमिनीवर येऊन मोसमी पावसाचे प्रवाह बळकट होऊ शकतील. त्यामुळे आठवडय़ानंतर पाऊस जोर धरू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 2:28 am

Web Title: mumbai rains continue to remain in hiding rain in mumbai zws 70
Next Stories
1 वैद्यकीय निष्काळजीपणाविरोधात आता ऑनलाइन दाद मागणे शक्य
2 गांधीजींचे ‘ते’ भित्तिचित्र पुन्हा लावायचे की नाही?
3 शालेय पोषण आहार अपहार प्रकरण : महिला बचतगटांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी
Just Now!
X