मुंबईत गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. फक्त मुंबईच नाही तर ठाणे, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी धुवाँधार पाऊस झाला. गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. दरम्यान IMD ने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढचे चोवीस तास आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

मागील चोवीस तासात १५० ते १८० मिमी पावसाची नोंद मुंबई आणि उपनगरांमध्ये करण्यात आली आहे असेही हवामान खात्याने म्हटले आहे. आपत्ती विभाग व्यवस्थापनाला आणि इतर विभागांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी बदलापूर, कल्याण, डोंबिवली परिसरात झालेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या २६ जुलैच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मुंबईच नाही तर रायगड आणि कोकण परिसरातही मुसळधार पावसाची हजेरी आहे. मुंबईत झालेल्या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरची वाहतूक वीस मिनिटे उशिराने सुरु आहे.

मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणीही साठलं आहे. पावसाने सध्या थोडी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.