News Flash

कुठल्याही क्षणी मुंबईवर वरूणराजा बरसणार!

"पाऊस नुसताच येणार नाही तर काही दिवस मुंबईवर बरसणार"

(छायाचित्र - निर्मल हरिंद्रन)

मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा आता कुठल्याही क्षणी संपणार आहे. गेल्या ४८ तासांमध्ये पावसानं दक्षिण भारतात जोर धरला असून तो निश्चित गतीनं पुढे सरकत आहे. कोकणामध्ये अलिबागजवळ पाऊस दाखल झाला असून तो कुठल्याही क्षणी मुंबईवर बरसेल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. सगळी परिस्थिती पावसाला अनुकूल असून आता त्यात बाधा येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

जूनचा पहिला आठवडा सरताना मुंबईत पाऊस धडकतो असा अनुभव असताना यंदा झालेल्या तब्बल १७ दिवसांच्या विलंबामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. जवळपास १५ दिवस पिछाडीवर असलेला पाऊस आधीची कसर मात्र भरून काढेल की नाही याबाबत साशंकता आहे. साधारणपणे मुंबईत एव्हाना मुसळधार पाऊस सुरू झालेला असतो. हलक्या सरींनी जरी एकदोनदा आगमन केलं असलं तरी अद्याप एक दिवसही मुसळधार पाऊस मुंबईत पडलेला नाही, ज्याची मुंबईकर आतुरतेनं वाट बघत आहेत.

परंतु हवामान खात्यानं जनजीवन उध्वस्त करणारा पाऊस सध्या तरी पडणार नाही असे सांगताना समाधानकारक पाऊस मात्र पडेल असा अंदाज वर्तवला आहे. काल रात्री राज्यात ठिकठिकाणी मध्यम, रिमझिम व दमदार पावसानं हजेरी लावली होती. मात्र, मुंबईत पावसाची अद्याप प्रतीक्षाच आहे.
परंतु, सोमवारी मुंबईत पाऊस नुसताच बरसणार नाही तर पुढील काही दिवस पावसाची मुंबईवर कृपा राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे. आत्तापासून कुठल्याही क्षणी पाऊस पडेल, नंतर २६ जून रोजी मुसळधार पावसाला सुरूवात होईल व नंतर काही दिवस मुंबईवर पावसाची चांगलीच बरसात होईल असा अंदाज आहे.

जूनमध्ये मुंबईमध्ये ४९३.१ मि.मि. पावसाचं लक्ष्य असतं, परंतु महिना संपत आला असताना आत्तापर्यंत किरकोळ पडलेल्या पावसामुळं अवघ्या १६५ मि.मि. इतक्याच पावसाटी नोंद झाली आहे. विलंब झालेला पाऊस जूनचं लक्ष्य गाठणार नाही असं दिसतंय, मात्र उशीरा का होईना पण पाऊस बरसणार अशी शक्यता दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 3:16 pm

Web Title: mumbai rains june skymet heavy moderate rains expected
Next Stories
1 मुंबईत बलात्कारानंतर ब्लॅकमेलिंग, विवाहितेचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
2 विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड
3 मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला ‘डिफॉल्टर’ यादीत, साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं
Just Now!
X