मुंबईमध्ये मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यातही मागील तीन आठवड्यांमध्ये दर शनिवार रविवारी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. या आठवड्यात मात्र पावसाचा हा जोर सोमवारी म्हणजे आजही कायम आहे. त्यामुळेच अनेकांनी स्वत:च स्वत:ला ही पावसाळी सुट्टी दिली आहे. अनेक शाळा-कॉलेजसने सकाळीच सुट्टी जाहीर केली. तर ज्यांना शक्य आहे ते आज घरून काम करत आहेत. मात्र या सगळ्या गोंधळातही ऑन ड्युटी चोवीस तास अशी ख्याती असणारे मुंबई पोलिस मुंबईकरांसाठी नेहमीप्रमाणे ऑन ड्युटी आहेत. याचबद्दल त्यांच्या ट्विटर अकाऊण्टवरून करण्यात आलेले एक ट्विट व्हायरल झाले आहे.

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये तीन ते चार ट्रॅफिक पोलिस पिवळ्या रंगाचे पावसाळी रेनकोट घालून रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करताना दिसत आहेत. या फोटोवर ‘अवर काईंड ऑफ मंण्डे मीटअप्स’ म्हणजेच आमच्या पद्धतीच्या सोमवारच्या भेटीगाठी असे वाक्य लिहीलेले आहे. या फोटोबरोबर एक कॅप्शनही लिहीली आहे. ‘पाऊस जोरदार आहे तसाच मुंबईच्या रस्त्यांवर आमचा बंदोबस्तही जोरदारच आहे. मुंबईकराच्या मदतीसाठी आम्ही (पावसातही) उभे आहोत. आम्ही आमच्या कामात सदैव तत्पर असून तुम्हाला निश्चित स्थळी सुरक्षित पोहचता यावे म्हणून तुमच्या प्रवासात तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत’ असे या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. पुढे  #RoadSafety #MumbaiRains हे हॅशटॅगही वापरले आहेत. म्हणजेच मुंबई पोलिसांनी पावसाळ्यात गाडी सावकाश चालवा असे सांगतानाच काही अचडण असल्यास पावसातही आम्ही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असल्याचा विश्वास मुंबईकरांना दिला आहे.

मुंबई पोलिसांचे ट्विटर हॅण्डलवरून नेहमीच जोरदार पाऊस असताना किंवा इतर महत्वाच्या दिवशी वाहतुकीसंदर्भातील अपडेट्स आणि माहिती शेअर केली जाते. या ट्विटसबरोबरच मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाऊण्ट हटके आणि ट्रेण्डींग विषयांवरून लक्षवेधी ट्विट करण्यासाठी लोकप्रिय आहे. त्याचच हा एक उत्तम नमून म्हणता येईल. याआधीही जुनच्या सुरुवातील झालेल्या जोरदार पावसामध्ये वाहतूक नियंत्रण करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील वाहतूक हवलदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

महेंद्रा अॅण्ड महेंद्रा उद्योगसमूहाचे कार्यकारी चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही या पोलिस अधिकाऱ्याचे कौतूक केले होते. त्या आधीही मागील वर्षी भारतरत्न सचिन तेंडूलकरने आपल्या गाडीमधून शूट केलेला व्हिडीओ ट्विट करुन मुंबई पोलिसांना पावसातही सेवा देत असल्याबद्दल धन्यवाद म्हटले होते.