मुंबई आणि उपनगरांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाने बुधवारी रात्रीपासून काही ठिकाणी पुन्हा जोर धरल्याचं चित्र दिसून आलं. मुंबईबरोबरच उपनगर परिसरामध्ये बुधवार रात्रीपासूनच जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. याच पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालीय. पवासाचा जोर इतका आहे की उंबरमाळी रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर नाही थेट प्लॅटफॉर्मच्या उंचीपर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेने रात्रीपासून या रेल्वे स्थानकातून होणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद केलीय.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मध्य रेल्वेच्या प्रमुख्य प्रवक्त्यांनी यासंदर्भातील माहिती दिलीय. उंबरमाळी रेल्वे स्थानक आणि कसारादरम्यानची वाहतुकीला पावसाचा फटका बसलाय. इगतपुरी आणि खर्डीदरम्यानची रेल्वे वाहतूक सुद्धा रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने थांबवण्यात आलीय. असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

मुंबईमध्ये बुधवार रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली. मालाड-जोगेश्वरीमध्ये अनेक ठिकणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पूर्व द्रुतगतीमार्ग आणि विलेपार्ले वांद्रे पट्यामध्येही अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. पूर्व द्रुतगतीमार्गावर भांडूप ते मुलुंडदरम्यानच्या पट्ट्यामध्ये पाणी साचल्याने आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी झाल्याचं पहायला मिळालं.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्येही जोरदार पाऊस झाल्याने तेथेही मोठ्याप्रमाणात प्राणी साचलं.

रात्रभर पडलेल्या पावसामुळे भिवंडीमध्येही मोठ्याप्रमाणात पाणी साचलं. अनेक रस्त्यांवर कंबरेच्या उंची इतकं पाणी साचल्याचं दिसत आहे.

विक्रमी पाऊस…

बुधवारीच हवामान खात्याने मुंबई, पालघर, रायगड आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली. दीर्घकालीन सरासरी ओलांडण्याचा मोसमी पावसाचा कल सलग दुसऱ्या महिन्यातही कायम आहे. जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाची सरासरी ८४० मिमी असताना यंदा मात्र १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत  सांताक्रूझ येथे १०३२.२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. याच कालावधीत कुलाबा येथे नोंदवला गेलेला पाऊसही दीर्घकालीन सरासरीच्या जवळपास म्हणजेच ७६१.६ मिमी इतका आहे. १ जूनपासून २१ जुलैला सकाळी ८.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १३६६ मिमी आणि सांताक्रूझ येते १९४३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे कमाल तापमानात ३ अंशांची घट झाली. दोन्ही ठिकाणी २७.४ आणि २७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

कशामुळे एवढा पाऊस?

वाऱ्याची द्रोणीय स्थिती आणि गुजरातपासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेली कमी दाबाची रेषा यांमुळे मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथे गुरूवारी सकाळी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस येथे मुसळधार  पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी येथे गुरूवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

धरणांतील साठ्यात चार दिवसांत तीन टक्के वाढ

राज्यभरात ठिकठिकाणी सुरू झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ४ दिवसांत तीन टक्क्यांनी वाढला आहे. शनिवारी राज्यातील धरणांमध्ये ३० टक्के  उपयुक्त पाणीसाठा होता. तो बुधवारी ३३.३९ टक्क्यांवर पोहोचला.