दर १५ मिनिटांनी पावसाची अद्ययावत माहिती

पावसाळ्यात शहर सुरू ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या बहुतांश विभागांमध्ये कामांना वेग आला असून दर १५ मिनिटांनी पावसाचे प्रमाण दाखवणाऱ्या मोबाइल अ‍ॅपचे आपत्कालीन विभागाकडून पुनरुज्जीवन केले जाणार आहे. १ जूनपासून पुन्हा सुरू होत असलेल्या या अ‍ॅपमधून पालिका तसेच हवामानशास्त्र विभागांतर्गत बसवल्या गेलेल्या ७० केंद्रांची माहिती दिली जाईल. पावसाळ्याचे चार महिने माहिती पुरवणे हा या अ‍ॅपचा प्रमुख उद्देश असला तरी या अ‍ॅपच्या माध्यमातून वर्षभर तापमानाची माहिती पुरवण्याचा विचार केला जात आहे.

दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने मुंबई मान्सून अ‍ॅप आणले होते. पूर्व-पश्चिम पसरलेल्या उपनगरातील आणि शेजारच्या शहरांमधूनही रोज लाखोंच्या संख्येने मुंबईच्या विविध भागांत प्रवास करणाऱ्या नागरिकांना पावसाची थेट माहिती मिळावी हा या अ‍ॅपचा उद्देश होता. गेल्या वर्षी आपत्कालीन विभागाकडून डिझास्टर मॅनेटमेंट या नावाने अ‍ॅपची नोंदणी करण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबईतील विविध केंद्रांकडून आलेली पावसाची माहिती या अ‍ॅपमधून मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. हे अ‍ॅप केवळ पावसाळ्यापुरते असल्याने गेले आठ महिने ते सुप्तावस्थेत होते. आता पुन्हा १ जूनपासून अ‍ॅपचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. यामध्ये पालिकेकडून उपनगरात लावल्या गेलेल्या ६० पर्जन्यमापकांवरील तसेच हवामानशास्त्र विभागाकडून सफर प्रकल्पांतर्गत लावल्या गेलेल्या दहा केंद्रांमधील माहिती दिली जाईल, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली. हवामानशास्त्र विभागाकडून शहरात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रातून आमच्याकडे येणारी माहिती पालिकेकडे पाठवली जाईल. ती माहिती अ‍ॅपमधून शहरातील लोकांपर्यंत पोहोचू शकेल, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले.

पावसाळ्यात या अ‍ॅपमध्ये दर १५ मिनिटांनी माहिती अद्ययावत केली जाईल. शहरातील विविध ७० ठिकाणी त्या त्या वेळी नेमका किती पाऊस पडतो आहे, याची कल्पना नागरिकांना येईल. त्या भागातून प्रवास करण्याबाबत, घरातून बाहेर पडण्याबाबत नागरिकांना निर्णय घेणे सोपे होईल. सध्या या अ‍ॅपमध्ये माहिती नोंदवण्याचे काम सुरू आहे. पावसासोबतच हवामानाचा अंदाज व भरती-ओहोटीच्या वेळाही या अ‍ॅपमधून दिल्या जातील. हे अ‍ॅप पावसाळ्यातील चार महिने सुरू राहीलच पण त्यानंतरही रोजच्या तापमानाची माहिती या अ‍ॅपमधून देण्याचा प्रयत्न आहे. हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रांमधून हवेच्या शुद्धतेचे प्रमाणही समजते. मात्र त्यासाठी सफर हे वेगळे मोबाइल अ‍ॅप असल्याने ती माहिती पालिकेच्या अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही.