मुंबई : केंद्र सरकारच्या गृह निर्माण आणि नगर विकास मंत्रालयाकडून देशभरात पहिल्यांदाच पाहणी करण्यात आलेल्या जीवनस्तर निर्देशांकांत मुंबईला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात मुंबईचा पहिला क्रमांक आला आहे.

जीवनतस्तर निर्देशांक निर्धारित करण्यासाठी देशभरातील १११ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. जीवनस्तर निर्देशांक निर्धारित करण्यासाठी देशभरातील शहरांमधील विविध बाबींचा सर्वस्तरीय व सर्वंकष अभ्यास करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने शहरातील संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक व भौतिक बाबींशी संबंधित १५ बाबींचा अभ्यास करण्यात आला. त्यात प्रशासन, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रोजगार, गृहनिर्माण, खुल्या जागा, विद्युतपुरवठा, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी बाबींचा समावेश होता. त्याचबरोबर या बाबींशी संबंधित विविध ७८ घटकांचाही अभ्यास या पाहणीत करण्यात आला होता. या पाहणीत मुंबईचा देशात तिसरा क्रमांक आला आहे. याबाबत प्रकाशित झालेल्या अहवालात नमूद केल्यानुसार पायाभूत सुविधा हा कुठल्याही शहरासाठी महत्त्वाची बाब असते. या वर्गवारीत मुंबईने सर्वोत्तम कामगिरी केली असल्याची नोंद या सर्वेक्षणात घेण्यात आली असून यात पाणीपुरवठा, मोकळ्या जागा, गृहनिर्माण, उपलब्ध जागांचा प्रभावी वापर, वाहतूक, विद्युतपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. मुंबईकरांना विविध सेवा सर्वोत्तम पद्धतीने देण्यासाठी महापालिका दीर्घकालीन आणि अल्पकालीन नियोजनाद्वारे सातत्याने प्रयत्नशील आहे. हा सन्मान मुंबईकरांचा आणि बृहन्मुंबई महापालिकेचा गौरव आहे, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले.