19 September 2020

News Flash

स्वच्छ शहरांमध्ये मुंबईची घसरगुंडी

पालिकेने सादर केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांमुळे मुंबईला ९०० पैकी ८२३ गुण मिळाले.

देशातील स्वच्छ शहरांमध्ये आठवा क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचा गुरुवारी नवी दिल्ली येथे सन्मान करण्यात आला. महापौर सुधाकर सोनावणे आणि पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

सव्वाकोटींपैकी अवघ्या पाच हजार मुंबईकरांकडून मतनोंदणी

‘स्वच्छ भारत अभियाना’त शहराला अग्रस्थान मिळावे यासाठी महापालिकेने निरनिराळ्या उपाययोजना केल्यानंतरही मुंबईकरांकडून साथ न मिळाल्यामुळे स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान असलेल्या मुंबईची घसरगुंडी उडाली. मुंबईकरांनी आपल्याच शहराला मत देण्यात हात आखडता घेतल्यामुळे गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर असलेली मुंबई यावर्षी २९व्या क्रमांकावर घसरली आहे. त्यामुळे मुंबईकरच मुंबईच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची भावना स्वच्छ शहरांची यादी जाहीर होताच पालिका वर्तुळात व्यक्त होऊ लागली. तर स्वच्छ शहरांच्या यादीतील पहिल्या दहा शहरांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या याची तुलना मुंबईशी करणे अयोग्य असल्याचेही मत पालिकेतील काही अधिकाऱ्यांकडूून व्यक्त होऊ लागले आहे.

स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईला आघाडीचे स्थान मिळावे म्हणून विविध उपाययोजना करूनही मुंबईकरांमध्ये मात्र याबाबत प्रचंड अनास्था आढ़ळून आली. स्वच्छ शहरांच्या क्रमवारीसाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी ९०० गुण, सर्वेक्षणाअंती ९०० गुण, तर नागरिकांनी फोनवरून अथवा ऑनलाइनद्वारे नोंदविलेल्या मतांसाठी ९०० गुण देण्यात येणार होते. पालिकेने सादर केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांमुळे मुंबईला ९०० पैकी ८२३ गुण मिळाले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाहणीसाठी आलेल्या समितीने सर्वेक्षणाअंती ५०० पैकी ४४७ गुण मिळाले. तर नागरिकांनी नोंदविलेल्या मताच्या आधारे ६०० पैकी केवळ २९९ गुण मुंबईला मिळाले. सव्वाकोटी मुंबईकरांपैकी केवळ ५०९६ जणांनी मुंबईच्या पारडय़ात मत टाकले आहे. तर स्वच्छ शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विशाखापट्टणममधील लोकसंख्या कमी असतानाही तब्बल १,५९,६८१ नागरिकांनी आपल्या शहराच्या पारडय़ात मत टाकले आहे. असेच मतदान प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इंदूर, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या भोपळमधील नागरिकांनी आपल्या शहरासाठी भरभरून मत नोंदविले आहे. मात्र मुंबईकरांच्या अनास्थेमुळे मुंबईला स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये २९व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

गेल्या वर्षी स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सुमारे ७५ शहरांचा समावेश होता. त्या वेळी १५३४ गुण मिळवून मुंबईने १०वा क्रमांक पटकावला होता. यंदा या यादीमध्ये ४३४ शहरांचा समावेश करण्यात आला असून १५३५ गुण मिळवून मुंबई २९व्या क्रमांकावर गेली. शहरांची वाढविलेली संख्या, मुंबईकरांनी मत नोंदविण्यात घेतलेला आखडता हात, मुंबईच्या तुलनेत अन्य शहरांमध्ये असलेली कमी लोकसंख्या आदी विविध कारणांमुळे मुंबईची घसरगुंडी उडाल्याची भावना पालिका वर्तुळात व्यक्त होऊ लागली आहे.

भाजपचा डाव

‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक घसरल्यामुळे शिवसेनेच्या गोटात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती. पारदर्शकतेच्या मुद्दय़ावर शिवसेनेला भविष्यात कोंडीत पकडण्यासाठी भाजपने डाव टाकल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये सुरू होती. स्वच्छतेमध्ये मुंबई मागे पडल्याचे दाखवून त्याचा दोष शिवसेनेवर थोपण्याचा भाजपचा डाव असल्याचे शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

प्रयत्नांची पराकाष्ठा

स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये मुंबईचा क्रमांक पहिल्या १० शहरांमध्ये यावा यासाठी पालिकेने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली होती. छोटय़ा शहरांमधील तब्बल एक लाख ते दीड लाख लोकांनी आपल्या शहरासाठी मत नोंदविले. पण मुंबईकरांनी मत नोंदविण्यात अनास्था दाखविल्याने मुंबईचा क्रमांक घसरला.  या अभियानातील शहरांची संख्या वाढविल्याने त्याचा मुंबईच्या क्रमांकावर परिणाम झाला आहे.

किरण दिघावकर,साहाय्यक आयुक्त,‘विभाग कार्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 3:10 am

Web Title: mumbai ranking down in swachh bharat rankings 2017
Next Stories
1 वैद्यकीयच्या पदव्युतर प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी सदोष
2 ..तर सेना जीएसटी विरोधात?
3 बेस्टला पाच टक्के व्याजदरासाठी स्थायी ठाम
Just Now!
X