गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; पालिकेकडून चोख व्यवस्था;  पुढील ११ दिवस ५० हजार पोलीस मुंबईच्या रस्त्यांवर

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषामुळे बुधवारपासून निनादून गेलेली मुंबापुरी आपल्या लाडक्या गणरायाच्या ओढीने भारावून गेली आहे. तर मुंबईचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ समजला जाणारा गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणाही पूर्णपणे सज्ज झाली आहे. सर्वसामान्य जनतेला त्रस्त करून सोडणारी इंधन दरवाढ, महागाई, शेअर बाजारातील पडझड आणि रुपयाची घसरगुंडी ही विघ्ने गणरायाच्या आगमनाने दूर होतील, या आशेनेच आज, गुरुवारी श्रीगणेशाचे धूमधडाक्यात स्वागत केले जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईकर सज्ज झाले असून गणेश आगमनाच्या मिरवणुकांमध्ये काही कमी पडू नये यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. त्याच वेळी गणेश आगमनाच्या मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडाव्या साठी पालिकाही सज्ज झाली आहे. येत्या शुक्रवारी दीड दिवसांच्या गणपतींचा विसर्जन सोहळा असल्यामुळे गिरगाव, दादर, जुहू चौपाटीसह ठिकठिकाणच्या विसर्जन स्थळांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

मुंबईत गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्य राज्य आणि परदेशातून मोठय़ा संख्येने भाविक येत असतात. ही बाब लक्षात घेऊन विसर्जन सोहळ्याचे आयोजन होत असलेल्या चौपाटय़ांवर उत्तम सुविधा उपलब्ध करण्याच्या आणि यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश पालिका प्रशासनाने विविध खात्यांना दिले आहेत.

यंदा गणेशोत्सवादरम्यान मुस्लीम धर्मियांचा मोहरम हा सणही येत आहे. अशा काळात गर्दी खेचणारी ठिकाणे दहशतवादी संघटनांकडून लक्ष्य केली जाण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई पोलिसांनी अवघ्या मुंबईभर सुरक्षेचे जाळे निर्माण केले आहे.

पुढील ११ दिवस शहर-उपनगरातील रस्त्यांवर तब्बल ५० हजार पोलीस तैनात असतील. फोर्स वन, जलद प्रतिसाद पथक(क्यूआरटी), राज्य राखीव पोलीस बल(एसआरपीएफ), शीघ्र कृती दल(रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स) बंदोबस्ताच्या कार्यात मुंबई पोलिसांना सहकार्य करणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी अतिउत्साही भक्त मंडळी समुद्रात, तलावांत उतरतात. त्यावेळेस अपघात घडल्यास सागरी पोलिसांना गस्त, बंदोबस्त वाढवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नौदल आणि तटरक्षक दलासोबत पोलीस समन्वय ठेवणार आहेत.

पोलीस दलाचे प्रवक्ते उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार सणउत्सवांच्या संभाव्य दहशतवादी कारवाया रोखणे याला कायम प्राधान्य आहे. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या पातळीवर गुप्तवार्ता संकलन करून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे आहेच.

शहरातील साडेसहा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपात, मंडपाबाहेर कॅमेरे उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याखेरीज मुंबई पोलिसांकडून अन्य काही ठिकाणांवर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

हरविलेली बालके किंवा व्यक्तींसाठी विशेष केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांमधून नातेवाईक, पोलीस, गणेश मंडळांशी समन्वय साधला जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातून गणेशोत्सवाआधीच अभिलेखावरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचेही सिंगे यांनी सांगितले.

 विसर्जन काळात ५३ रस्ते वाहतुकीसाठी बंद

दिड, पाच, सात आणि अकरा दिवसांच्या गणेशमुर्त्यांचे विसर्जनासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना आखली आहे. विसर्जनाच्या दिवशी दुपारी बारा ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. ५६ रस्ते एकमार्गी, १८ रस्त्यांवरील अवजड वाहतुकीला मनाई आणि ९९ ठिकाणी पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे.

गणेशपूजन सायंकाळी पावणेसातपर्यंत

मुंबई : गणपतीचे पूजन गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी ६.४२ पर्यंत करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.  गणेशपूजनासाठी मध्यान्हकाळ हा प्रशस्त मानला जातो. गुरुवारी सकाळी ११.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. परंतु सर्वाना या वेळेत गणेशपूजन करणे शक्य होत नाही. म्हणून गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून