मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्राला डिसेंबर महिन्यात सुगीचे दिवस आल्याचं दिसतंय. कारण, डिसेंबरमध्ये घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. करोना व्हायरस महामारीमुळे २०२० ची सुरूवात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी खूपच वाईट होती. पण, वर्षाच्या अखेरीस मात्र चांगले दिवस आले आहेत.

SquareFeatIndia च्या रिपोर्टनुसार, डिसेंबरच्या अवघ्या १६ दिवसांमध्ये अर्थात १६ डिसेंबरपर्यंत मुंबईत तब्बल ७९०५ घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षातील डिसेंबर महिन्याच्या तुलनेत हा आकडा बराच जास्त आहे. डिसेंबर २०१९ मध्ये केवळ ६४३३ घरांची विक्री झाली होती. घरांच्या विक्रीचा वेग असाच कायम राहिल्यास डिसेंबर २०२० मध्ये घरांच्या विक्रीचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर 2020 च्या पहिल्या १८ दिवसांमध्ये ५५७४ घरांची विक्री झाली होती. तर नोव्हेंबर संपेपर्यंत हा आकडा ९३०१ वर पोहोचला आणि वर्ष २०१२ मधील सर्वाधिक विक्रीचा रेकॉर्ड तुटला. या आकडेवारीनुसार जर डिसेंबरच्या पहिल्या १६ दिवसांतील विक्रीचा आकडा पाहिल्यास आणि विक्रीचा झपाटा असाच सुरू राहिल्यास या महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात एक नवा विक्रम स्थापीत होण्याची शक्यता आहे.

काय आहे कारण ?
राज्य सरकारने करोना काळात आलेली मंदी दूर करुन रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये कपात करत घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे. तेव्हापासून ( सप्टेंबर )मुंबई-महाराष्ट्रात घर खरेदीला वेग आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के आणि मार्च २०२१ पर्यंत दोन टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे घर खरेदीचा वेग असाच कायम राहील असं मानलं जात आहे. याशिवाय घर खरेदीवर काही डेव्हलपर्सकडून आकर्षक ऑफर्सही दिल्या जात आहेत. त्यामुळे घर खरेदीचा वेग मुद्रांक शुल्कातील सवलत असेपर्यंत कायम राहील, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.