विकासकांना डोळ्यांसमोर ठेवून मुंबईच्या २०१४ ते ३४ या काळातील विकास आराखडय़ाला मुदतवाढ देण्यात आली असून त्यासाठी विकासक ‘मातोश्री’वर खेटे घालत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने बुधवारी स्थायी समितीत करताच सत्ताधारी शिवसेना-भाजप नगरसेवकांचे पित्तच खवळले. उभयतांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे स्थायी समितीला आखाडय़ाचे स्वरूप आले होते.
मुंबईच्या आगामी विकास आराखडय़ाच्या प्रारूपावर नागरिक, सामाजिक संस्था आणि संघटनांकडून तब्बल ६५ हजार सूचना आणि हरकती सादर करण्यात आल्या असून त्या विचारात घेऊन विकास आराखडय़ाच्या प्रारूपात सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे सुधारित विकास आराखडा सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बैठकीत सादर केला होता.
विकास आराखडय़ाला मुदतवाढ मिळावी यासाठी विकासक ‘मातोश्री’ आणि ‘कत्तक भवन’ येथे खेटे घालत होते, असा आरोप काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केला. विकासक मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर बॅग घेऊन उभे असतात, असा  आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.