मुंबई : मुंबईमधील करोना वाढीचा सरासरी दर रविवारी ०.४४ टक्क्य़ांपर्यंत खासी घसरला. तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९१ टक्क्य़ांवर पोहोचले आहे. मुंबईतील २,४०३ जणांना रविवारी करोनाची बाधा झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईतील दररोज बाधा होणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसू लागली आहे. रविवारी २,४०३ जणांना बाधा झाल्यानंतर मुंबईतील एकूण बाधितांची संख्या सहा लाख ७६ हजार ४७५ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ४४ पुरुष आणि २४ महिलांचा रविवारी करोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैक ४० जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत १३ हजार ८१७ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ३,३७५ रुग्ण रविवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत मुंबईतील सहा लाख १३ हजार ४१८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला ४७ हजार ४१६ करोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मुंबईमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी १५३ दिवसांवर पोहोचला आहे.

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील तब्बल २५ हजार ६९२ संशयीत रुग्णांचा शोध घेण्यात आला असून त्यापैकी ९२९ संशयीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित संशयीत रुग्णांना अटीसापेक्ष गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाधित रुग्ण सापडल्यामुळे प्रतिबंधित ठिकाणे आणि टाळेबंद करण्यात येणाऱ्या इमारतींची संख्या कमी झाली आहे.