देशभरात पसरलेल्या करोना विषाणूशी लढण्यासाठी सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स सातत्याने काम करत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये याकरता महाराष्ट्रात राज्य सरकारने खबरदारीचे उपाय घेतले आहेत. ज्यामध्ये रेल्वेसेवा बंद करण्यात आली असून, लोकांना गर्दी टाळण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिवनावश्यक वस्तुंचा अपवाद वगळता सध्या महाराष्ट्रात सर्व सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत.

मात्र काही भागांमध्ये लोकांमध्ये करोनाविषयी म्हणावं तितकं गांभीर्य दिसून येत नाहीये. मुंबई शहरात आतापर्यंत जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ११२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या दुकानांवर सर्वात जास्त कारवाई करण्यात आलेली आहे. पाहूयात आतापर्यंत कशी कारवाई झालेली आहे..

  • करोना संदर्भात – ३
  • हॉटेल आस्थापना – १६
  • पान टपरी – ६
  • इतर दुकानं – ५३
  • हॉकर्स/फेरीवाले – १८
  • सार्वजनिक ठिकाणी गर्दी – १०
  • अवैध वाहतुक – ६

मुंबई, पुणे आणि राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये पोलिस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून बाहेर पडणाऱ्या लोकांची चौकशी करत आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना पोलिसांच्या लाठीचाही प्रसाद मिळतो आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकार हे उपाय करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे जनतेने अधिकाधिकवेळ घरात राहून सरकारी यंत्रणांना मदत करणं गरजेचं आहे.