१,२४० जणांना लागण, ४८ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील चाचणीअंती जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिदिन करोना रुग्णांची संख्या दीड हजाराच्या खाली घसरली आहे. मात्र तुलनेत चाचण्याही कमी करण्यात आल्या आहेत. सोमवारी मुंबईतील १,२४० जणांना करोनाची बाधा झाली, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला.

तौक्ते चक्रीवादळामुळे दिवसभर मुंबईत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. परिणामी, पालिकेला वादळाचाही सामना करावा लागला. चक्रीवादळामुळे सोमवारी मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. मात्र करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्या करण्यात येत होत्या. दिवसभरात १७ हजार ६४० चाचण्या करण्यात आल्या. तत १,२४० जणांना करोनाची बाधा झाली. मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या सहा लाख ८९ हजार ९३६ वर पोहोचली. तर आतापर्यंत मुंबईतील १४ हजार ३०८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे २,५८७ रुग्ण सोमवारी करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईमधील रुग्ण करोनामुक्त होण्याच्या दरात एक टक्क्य़ाने वाढ होऊन ९३ टक्क्य़ांवर स्थिरावला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरी २४६ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच करोना वाढीचा दर ०.२८ टक्के इतका झाला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १,३६० नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी १,३६० नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, ५७ जणांचा करोनामुळे मृत्यू  झाला. त्यामुळे जिल्ह्य़ात आतापर्यंत ५ लाख २ हजार १०७ बाधित आढळले असून ८ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला. कल्याण- डोंबिवलीत ५०२, ठाणे २३३, ठाणे ग्रामीण २००, मिराभाईंदर १४२, नवीमुंबई १३७, उल्हासनगर ६७, बदलापूर ४२, अंबरनाथ ३० व भिवंडीत सात रुग्ण आढळले आहेत.