अमर सदाशिव शैला, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदी काळात थंडावलेले भाडय़ाच्या घरांचे व्यवहार पुन्हा रुळांवर येऊ लागले असून मागील तीन महिन्यांत प्रलंबित भाडेकरारांचे नूतनीकरण, भाडय़ाची नवीन घरे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

ऑगस्टमध्ये घरांच्या भाडेकराराच्या व्यवहारात काहीशी वाढ झाली. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत ती कमीच होती. सप्टेंबरपासून अर्थव्यवस्था भरारी घेत असल्याचे चित्र दिसताच अनेकांनी प्रलंबित ठेवलेल्या भाडय़ाचे घरांचे करार नूतनीकरणास सुरुवात केली. यंदा सप्टेंबरमध्ये १९,८६५ घरे, गाळे आणि कार्यालये यांच्या भाडेकरारांची नोंदणी निबंधक कार्यालयाकडे झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात १६,६९२ नोंदी झाल्या होत्या, तर ऑक्टोबरमध्ये यंदा २२,५४४ आणि नोव्हेंबरमध्ये २०,५४४ भाडेकरार झाले आहेत. गेल्या वर्षी या महिन्यांत अनुक्रमे २१०१५ व १८८४५ घरे, तसेच आस्थापने भाडय़ाने दिली होती.

टाळेबंदीच्या कडक अंमलबजावणीमुळे एप्रिल ते मे या काळात घर भाडय़ाच्या मुंबईतील व्यवहारांनी एक हजाराचा आकडाही गाठला नव्हता. जूनमध्ये टाळेबंदी शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यावर या व्यवहारांना थोडीफार सुरुवात झाली. मात्र करोनामुळे आणि रोजगारावर गदा आल्याने अनेकांनी गाव गाठले. परिणामी मागणी कमी होऊन मुंबईतील बहुतांश घरे रिकामी झाली. त्यातच आर्थिक चणचणीमुळे आधीचेच प्रलंबित भाडे देणे शक्य नसताना कराराचे नूतनीकरण होत नव्हते. मात्र सप्टेंबरपासून व्यवसाय आणि रोजगार काही प्रमाणात सुरू झाल्याने प्रलंबित करारांचे नूतनीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे तीन महिन्यांत भाडय़ांच्या घरांच्या नोंदणीत वाढ झाली आहे, अशी माहिती रिअल इस्टेट एजंट हितेंद्र उपाध्याय यांनी दिली.

मागील तीन महिन्यांत घरांच्या व्यवहारात वाढ झाली असली तरी अद्यापही मागील वर्षांच्या तुलनेत व्यवहार कमीच आहेत. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर १ लाख ६८ हजार नागरिकांनी भाडय़ाची घरे व आस्थापने घेतली होती. तर यंदा १ लाख २ हजार नागरिकांनी व्यवहार केल्याचे निबंधक कार्यालयाच्या आकडेवारीतून समोर येत आहे. घरांच्या विक्रीत मागील काही महिन्यांत चांगली वाढ झाली आहे. मात्र भाडय़ाच्या घरांचे व्यवहार अद्यापही अपेक्षेप्रमाणे सुरळीत झाले नाहीत, असे रिअल इस्टेट एजंट अभिजीत जोशी यांनी सांगितले.

टाळेबंदीत ऑफलाइन नोंदणी कमी

करोनाचा धोका आणि लोकल रेल्वे सेवा बंद असल्याने नोंदणी कार्यालयात जाऊन भाडेकरार करण्याऐवजी बहुतांश नागरिकांनी ऑनलाइन करार करण्याकडे मोर्चा वळविला आहे. त्यातून यंदा सप्टेंबरमध्ये २,४०१ ऑफलाइन करार झाले, तर ऑक्टोबरमध्ये २,६७३ आणि नोव्हेंबरमध्ये २,७४९ भाडेकरार झाले. गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनुक्रमे ३,३०२, ४,१७४ आणि ४,६१५ ऑफलाइन करार झाले.