राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरांमधील दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही चिंताजनक असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादले जात आहेत. मात्र तरी देखील रूग्णांच्या संख्येतील वाढ सुरूच असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात मुंबईत ११ हजार १६३ नवीन करोनाबाधित आढळले, तर २५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय दिवसभरात ५ हजार २६३ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.

मुंबईतील एकूण बाधितांची संख्या आता ४ लाख ५२ हजार ४४५ वर पोहचली असून, आजपर्यंत ११ हजार ७७६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. मुंबईतील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ६८ हजार ५२ आहे. तर, ३ लाख ७१ हजार ६२८ रूग्ण आजपर्यंत करोनातून बरे झाले आहेत.

मुंबईत रात्री अत्यावश्यक सेवानांच परवानगी; पालकमंत्री शेख यांची माहिती

दरम्यान, मुंबईतील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत काही कडक निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुंबई शहर व महाराष्ट्रात करोना रूग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत काही कठोर निर्णय घेण्यात आलेले आहेत. अगोदपासूनच रात्री जी संचारबंदी सुरू होती, आता त्यात हा बदल असेल की केवळ अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांनाच रात्री वाहन चालवण्यास परवानगी मिळेल. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.