मुंबई : मुंबईत शनिवारी १,७९१ जणांना करोनाची बाधा झाली असून ४७ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ८२ वरून ८६ दिवसांवर पोहोचला असून, करोनामुक्तांच्या प्रमाणातही सुधारणा होत आहे.

गेले काही दिवस सातत्याने मुंबईतील करोनाबाधितांची संख्या वाढत असून, एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४० हजार ३३९ वर पोहोचली आहे. शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या ४७ रुग्णांमध्ये २९ पुरुषांचा, तर १८ महिलांचा समावेश होता. त्यातील ३८ जणांना दीर्घ आजार होते. आतापर्यंत मुंबईतील ९,६८२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले २,९८८ रुग्ण शनिवारी करोनामुक्त झाले. आतापर्यंत दोन लाख आठ हजार ९९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये १५ हजार २३० चाचण्या करण्यात आल्या. करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत १३ लाख ४० हजार ७६७ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

९,५११ इमारती टाळेबंद : करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे ९,५११ इमारती टाळेबंद करण्यात आल्या असून ६३८ चाळी-झोपडपट्टीतील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये पालिकेला करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या १४ हजार ५८९ अतिजोखमीच्या गटातील संशयित रुग्णांचा शोध घेण्यात यश आले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १,१२७ नवे रुग्ण; ३० जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्य़ात शनिवारी १ हजार १२७ करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १ लाख ९९ हजार ३८७ इतकी झाली आहे. दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ५ हजार ४५ वर पोहोचली आहे.

शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ३२७, नवी मुंबई शहरातील २४३, कल्याण-डोंबिवली शहरातील २३८, मीरा-भाईंदरमधील १०६, ठाणे ग्रामीण ८३, बदलापूर ४४, अंबरनाथमधील ३२, उल्हासनगरमधील ३२ आणि भिवंडीतील २२ रुग्णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील आठ, ठाणे शहरातील सात, नवी मुंबईतील पाच, मीरा-भाईंदरमधील पाच, अंबरनाथमधील तीन तर उल्हासनगर आणि भिवंडीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.