६३५ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या ५०० ते ७००च्या दरम्यान स्थिरावली आहे. बुधवारी ६३५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला. तर एका दिवसात ५८२ रुग्ण करोनामुक्त झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या सात हजारांच्या खाली गेली आहे. रुग्णदुपटीचा कालावधीही ९२८ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या सात लाख २९ हजारांपुढे गेली आहे. करोना मृतांची एकूण संख्या १५ हजार ६५४ झाली आहे. आतापर्यंत सात लाखांहून अधिक म्हणजेच ९६ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ६,९८९ झाली आहे.

मंगळवारी ३५ हजार ९६८ चाचण्या करण्यात आल्या होत्या. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ४८९ बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी ४८९ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत, तर नऊ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील ४८९ करोना रुग्णांपैकी कल्याण- डोंबिवली १४१, नवी मुंबई ११४, ठाणे ७८, मीरा-भाईंदर ५२, ठाणे ग्रामीण ३८, बदलापूर २६, अंबरनाथ २२, उल्हासनगर १४ आणि भिवंडीमधील चार रुग्ण आढळून आले. तर ठाणे तीन, उल्हासनगर तीन, नवी मुंबई दोन आणि कल्याण-डोंबिवलीमधील एका रुग्णाचा समावेश आहे.