राणी बागेतील शिवा गेंडा ३४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बुधवारी अखेर जोडीदारापर्यंत पोहोचला. १४०० किलोमीटरचे अंतर ७५ तासांच्या प्रवासात पार करुन शिवा नवी दिल्ली येथील प्राणीसंग्रहालयात बुधवारी संध्याकाळी पोहोचला.
गेली २८ वर्षे मुंबईच्या वीरमाता जिजाबाई प्राणी संग्रहालयात असलेल्या ३४ वर्षांच्या एकशिंगी शिवा गेंडय़ाला नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात सोडण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात घेण्यात आला. शिवाला जोडीदार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश २००५ मध्ये उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार अनेक प्राणीसंग्रहालयांकडे विनंती करूनही जोडीदार मुंबईत आणता आला नसल्याने अखेर शिवालाच नवी दिल्लीला पाठवण्याचे ठरले. तिथे १५ वर्षांची एक आणि आठ वर्षांची एक अशा दोन माद्या आहेत.
शिवाला गेल्या बुधवारी नवी दिल्लीला रवाना करण्यात येणार होते. छताकडील बाजूने लोखंडी जाळी असलेला आणि चारही भिंती लाकडाच्या असलेला पिंजरा त्याच्यासाठी मागवण्यात आला होता. मात्र, शिवा पिंजऱ्याकडे फिरकला नाही. अखेर रविवारी, १८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता शिवाची स्वारी दिल्लीला निघाली.
‘बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता शिवा प्राणीसंग्रहालयात पोहोचला. शिवाला या प्रवासात त्रास झाला नाही. तो नियमितपणे जेवत होता. नवी दिल्लीतील प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यातही तो शांतपणे गेला,’ अशी माहिती प्राणीसंग्रहालय संचालक अनिल अंजनकर यांनी दिली.
नवीन वातावरणात स्थिरावण्यासाठी गेंडय़ाला काही महिने लागतात. त्यामुळे शिवाला दिल्लीचे हवामान किती मानवते हे काही काळाने स्पष्ट होईल.