नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीप्रसंगी सज्जतेसाठी पावले

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : उभी-आडवी विस्तारत चाललेली मुंबई ही मुळात सात बेटांचा समूह.  या आर्थिक राजधानीला भेडसावणारा अतिवृष्टी आणि पुराचा धोका दरवर्षी दिसतोच. पण याखेरीज भूकंप, त्सुनामी, इमारत दुर्घटना अशा नैसर्गिक, मानवनिर्मित संकटांची यादी मोठी आहे. अशा संकटसमयी कशी सज्जता असावी, हे निश्चित करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. त्यासाठी येत्या जूनपर्यंत मुंबईचा जोखीम विश्लेषण अहवाल तयार करण्यात येणार आहे.

मुंबईला दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. कधी दरडी कोसळणे, इमारत पडणे अशा दुर्घटनाही घडतात. तर कधी बॉम्बस्फोट, अपघात अशाही घटना घडतात.  मुंबईत लोकसंख्येची घनताही खूप अधिक असल्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर मोठी जीवितहानी होण्याचा धोकाही असतो. तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे वित्तहानीही मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे पालिके ने आता अशा संभाव्य धोक्यांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक होणाऱ्या दुर्घटनांसाठी मुंबई सज्ज असावी म्हणून पालिके ने जोखीम मूल्यांकन करण्याचे ठरवले आहे. हा जोखीम विश्लेषण अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईचे जोखीम मूल्यांकन करताना विभाग कार्यालयनिहाय आराखडा तयार के ला जाणार आहे. मुंबईतील प्रत्येक विभागात परिस्थिती वेगळी आहे. काही विभागांत दरडींचे प्रमाण जास्त आहे, काही ठिकाणी गगनचुंबी इमारती जास्त आहेत, काही ठिकाणी समुद्रकिनारा आहे. हे सारे पाहून हा आराखडा तयार के ला जाणार आहे. एखादी घटना घडल्यानंतर जास्त नुकसान होऊ नये याकरिता कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील,  अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.