भांडुप उड्डाण पुलावर भरधाव होंडा सिटी-कंटेनर यांची समोरासमोर धडक

अंधेरीहून ठाण्याच्या दिशेने निघालेली भरधाव होंडा सिटी कार समोरून येणाऱ्या कंटेनरला आदळली. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पूर्वद्रुतगती मार्गावरील भांडुप उड्डाणपुलावर घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू ओढवला. तर अन्य तिघे गंभीररीत्या जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मुलुंडच्या वोखार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नवघर पोलिसांनी कारचालक तरुणाविरोधात गुन्हा नोंदवून पुढील चौकशी व तपास सुरू केला आहे.

नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निहार गोळे (२२) आणि यश चौगुले (२१) या दोघांचा अपघातानंतर जागीच मृत्यू ओढवला. तर हेमांग शिरगुंडे, अक्षय मोरे, महेश पद्मनाथन हे तिघे गंभीररीत्या जखमी झाले. अपघात घडला तेव्हा हेमांग कार चालवत होता. पोलिसांच्या त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

मृत, जखमी मित्र असून शुक्रवारी अंधेरीत आले होते. तेथून परतताना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भांडुप पंपिंग स्टेशन येथील पूर्वद्रुतगती मार्गावरील उड्डाण पुलावर त्यांच्या होंडा सिटी कारचे नियंत्रण सुटले. कार दुभाजकावरून दक्षिण वाहिनी म्हणजे ठाण्याकडून शीवच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर गेली आणि पूल चढून येणाऱ्या कंटेनरला त्याच वेगात आदळली. कंटेनर चालक आणि अन्य वाहनचालकांनी बचावकार्य सुरू केले, पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलीस आणि वाहनचालकांनी या पाचही जणांना वोखार्ट रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच निहार, यश यांना मृत घोषित केले गेले. तर अन्य तिघांवर उपचार सुरू करण्यात आले.

हा अपघात पाहणाऱ्या कंटेनर चालक, सहकारी आणि अन्य वाहनचालकांनी नवघर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार होंडा सिटी कार प्रचंड वेगाने ठाण्याच्या दिशेने जात होती. पुलावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी पुढील तपासासाठी कार ताब्यात घेतली आहे. अपघातानंतर कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाल्याचे स्पष्ट आढळते.

मृतांपैकी निहार ठाण्याच्या श्रीरंग सोसायटीतील विनायक इमारतीतला तर यश कुपवाड, सांगलीचा रहिवासी आहे. अपघातग्रस्त कार कोणाची आहे, ती चालवणाऱ्या जखमी तरुणाकडे परवाना होता का, हे सर्व अंधेरीला कशासाठी आले होते, ते दारू किंवा अमली पदार्थाच्या नशेत होते का, याबाबत नवघर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

अमेरिकेमध्ये  शिक्षणाचे स्वप्न अधुरेच..

ठाण्याच्या श्रीरंग सोसायटी आणि आसपासचे सुमारे १५ मित्र पाच गाडय़ांमधून शुक्रवारी साकिनाका येथील एका हॉटेलमध्ये आले होते. तेथून परतताना हेमंत शिरगुंडे चालवत असलेल्या होंडा सिटीला उड्डाणपुलावर अपघात घडला. त्या वेळी यांच्यापैकी एक गाडी मागे होती. त्यातील मित्रांनी पुढे गेलेल्या मित्रांना सूचना दिली. पोलीस आणि अन्य वाहनचालकांच्या मदतीने होंडा सिटीतील पाचही जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले. यापैकी मृत पावलेले निहार गोळे आणि यश चौगुले हे मावस भाऊ आहेत. यश सांगलीचा रहिवासी असून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाणार होता. व्हिसाच्या कामानिमित्त तो निहारकडे आला होता, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पी. जी. सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. दरम्यान, गोळे कुटुंबाने निहारच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही नवघर पोलिसांनी सांगितले.