रस्ते घोटाळाप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर कारवाई करणार

रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्यांची नावे ‘काळ्या यादी’त टाकण्यासाठी प्रशासनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. निविदांमध्ये तशी तरतूद नसल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात येत असून २०१५ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार आता या कंत्राटदारांची नावे ‘काळ्या यादी’त टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रस्ते घोटाळा प्रकरणात अडकलेल्या सहा कंत्राटदारांविरुद्ध पालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या कंत्राटदारांची नावे ‘काळ्या यादी’त टाकण्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र अद्याप या कंत्राटदारांवर ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आलेली नाही. तसेच निविदा प्रक्रियेत निकृष्ट दर्जाची कामे केल्याबद्दल कंत्राटदारांची नावे ‘काळ्या यादी’त टाकण्यात येतील अशी अटही घालण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पालिकेने २०१५ मध्ये आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली असून या सुधारणांचा आधार घेत घोटाळेबाज कंत्राटदारांची नावे ‘काळ्या यादी’त टाकण्यात येणार आहे.

नालेसफाई घोटाळ्यातील कंत्राटदारांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईत प्रशासनाकडून काही त्रुटी राहून गेल्या होत्या. त्यामुळे न्यायालयाने या कंत्राटदारांना नैसर्गिक न्याय देण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने नालेसफाईतील कंत्राटदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. अशी त्रुटी रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांच्या बाबतीत घडू नय म्हणून प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. या कंत्राटदारांवर येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची नावे ‘काळ्या यादी’त टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.