मुंबई शहर गेल्या आठ महिन्यांतील तब्बल २२९ बलात्काराच्या घटनांचे साक्षीदार बनले आहे. त्यात आठ सामूहिक बलात्काराच्या घटनांचा समावेश आहे. इतकेच नव्हे महत्वाची गोष्ट म्हणजे, या सर्व घटनांमध्ये मुख्यत्वे पिडित महिलेचे मित्र, प्रेमी आणि शेजारीच आरोपी असल्याचेही माहिती अधिकाऱयाच्या आधारे मिळविण्यात आलेल्या अहवालातून समोर आले आहे.
मुंबईतील समाजसेवक अनिल गल्गली यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत मुंबईतील बलात्काराच्या घटनांबद्दल माहिती मागविली होती. यात मुंबईत गेल्या आठ महिन्यांमध्ये शक्तीमिल कंपाऊंडमधील दोन प्रकरणे पकडून एकूण २२९ बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
अनिल गल्गली म्हणाले, गेल्या आठ महिन्यांत मुंबईत २२९ बलात्काराच्या घटना घडल्या, त्यात या वर्षाच्या अखेरीपर्यंत आता नोव्हेंबरमध्ये दींडोशी आणि बोरीवली येथे झालेल्या दोन बलात्कार प्रकरणेही हा आकडा वाढवतील. मागील वर्षी २२३ बलात्काराच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. २०११ साली हा आकाडा २११ होता तर, २०१० साली १८८ त्यामुळे आकडेवारी पाहता दरवर्षी मुंबईत बलात्करांच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. त्यामुळे मुंबई महिलांसाठी कोणत्याही दृष्टीने सुरक्षीत नाही. असेही ते म्हणाले.
प्रत्येक वर्षी मुंबईच्या रस्त्यांवर पोलिसांच्या गस्तीचे प्रमाणही घटत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाकाबंदी करण्यातला सुरक्षेचा मुद्दाच हरविला आहे की काय? असे वाटते. तरीसुद्धा मुंबई पोलिस मुंबई महिलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा करतात. मग, दरवर्षी बलात्काराच्या घटनांचा आकडा वाढला कसा? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.