‘सेरो’ सर्वेक्षणातील निष्कर्ष; झोपडपट्टय़ांमध्ये वृद्धांना सर्वाधिक बाधा

मुंबई : शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तर बिगरझोपडपट्टी भागांत तरुण वयोगटातील सर्वाधिक करोनामुक्त झाल्याचे सेरो सर्वेक्षणातून निरीक्षणास आले आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), मुंबई पालिका आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात माटुंगा (एफ उत्तर), चेंबूर (एम पश्चिम) आणि दहिसर (आर उत्तर) या तीन विभागांत ६,९३६ रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले. चेंबूरमधील झोपडपट्टीत १,५१८ जणांमध्ये आणि बिगर झोपडपट्टीत ९४२ जणांच्या प्रतिपिंडाची चाचणी केली गेली. तर दहिसरमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे ५७२ आणि ५७५ होते. माटुंग्यात झोपडपट्टीतील २,१४४ आणि बिगर झोपडपट्टीतील १,१८३ रहिवाशी सहभागी झाले होते.

बिगर झोपडपट्टी भागामध्ये संसर्ग झालेल्यांचे प्रमाण सुमारे १६ टक्के आढळले. यात सर्वाधिक माटुंग्यात (१७ टक्के), तर सर्वात कमी(११ टक्के) दहिसरमध्ये आहे. पुरुषांच्या (सुमारे १५ टक्के) तुलनेत महिलांमध्ये (सुमारे १७ टक्के) संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. वयोगटानुसार, १२ ते २४ म्हणजेच तरुण वयोगटामध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक (सुमारे १८ टक्के) असल्याचे आढळले, तर ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये मात्र हे प्रमाण सुमारे १२ टक्के आहे.

झोपडपट्टी भागांत मात्र उलट चित्र असून ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक म्हणजेच सुमारे ६२ टक्के आढळले. त्या खालोखाल ४१ ते ६० वयोगटातील प्रमाण सुमारे ५९ टक्के आहे. ज्येष्ठ नागरिक जोखमीच्या गटात असल्याने घराबाहेर न पडण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असल्याने बिगर झोपडपट्टी विभागात संसर्गाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असल्याचे मत या अभ्यास गटातील तज्ज्ञांनी नोंदविले.

१० ऑगस्टपासून दुसरा टप्पा

’ सेरो सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा १० ऑगस्टपासून याच तीन विभागात सुरू होणार आहे. दोन आठवडय़ांच्या या सर्वेक्षणामध्ये सुमारे सहा हजार रहिवाशांच्या प्रतिपिंड चाचण्या केल्या जातील.

’ संसर्गाचे प्रमाण महिनाभरात किती आहे याची पडताळणी यात केली जाईल. पहिल्या टप्प्यात घेतलेल्या रहिवाशांचा यात पुन्हा समावेश केला जाणार नाही. पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी भागातून योग्य प्रतिसाद मिळाला असला तरी बिगर झोपडपट्टी भागांतील नागरिक मात्र अभ्यासात सहभागी होण्यास तयार नव्हते.

’ या अभ्यासातून सामूहिक प्रतिरोध शक्ती निर्माण झाली आहे, का याची चाचपणी केली जाणार आहे. त्यामुळे बिगर झोपडपट्टी भागांतील नागरिकांनी अधिक संख्येने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन ‘टीआयएफआर’चे प्राध्यापक डॉ. उल्लास कोलथूर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.