मुंबईत रविवारी होत असलेल्या गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सभास्थळ आणि आसपासच्या परिसरामध्ये तब्बल तीन हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये रविवारी दुपारी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. मोदी यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून सभेसाठी तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी दिली.
सभेसाठी  १० ते १२ हजार छोटय़ा गाडय़ा आणि दोन हजार बसगाडय़ा येण्याची शक्यता आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती वगळता या सर्व गाडय़ा दोन ते तीन किलोमीटर अंतरावर थांबविण्यात येतील. सभास्थानी तीन आयपीएस दर्जाचे अधिकारी आणि त्यांचे पथक असणार आहे. साध्या वेषातील पोलीस सभास्थानी तैनात असतील. त्याशिवाय बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक, दहशतवाद विरोधी सेल, शीघ्र कृती दल तैनात केले जाणार आहे.
या सभेत आत्मघाती मानवी बॉम्बचा धोका लक्षात घेऊन ठोस उपाययोजना करण्यात आली आहे. गर्भवती महिलांचीही विशेष तपासणी केली जाणार आहे. सभेच्या काळात या ठिकाणी ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकाची किमान दोन वेळा तपासणी केली जाणार आहे. तसेच तपासणीसाठी ‘सिक्युरिटी प्लाझा’ उभारण्यात आले असून त्यामुळे एकाच वेळी शंभर जणांची तपासणी होऊ शकेल. महिनाभरापासून मुंबईच्या हॉटेल्समध्ये थांबलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. तसेच शहरात सर्वत्र नाकाबंदीही करण्यात येणार आहे.
‘एटीएस’ही सज्ज
मोदी यांच्या सभेत कुठलाही घातपात होऊ नये यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून राज्याच्या दहशतवादविरोधी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी या सभेच्या वेळी पाळतीवर असणार आहेत. साध्या वेशातील अधिकारी या सभेत सहभागी होऊन खास लक्ष ठेवणार आहेत. राज्यातील दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनाही या सभेसाठी खास मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. याशिवाय काही संशयितांची कसून चौकशीही केली जात आहे. कुठल्याही स्थितीती घातपात होऊ नये, यासाठी आम्हीही तयार असल्याचे एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.