गुरुवारी १५ रुग्णांची भर; चाचण्या निगेटिव्ह आल्याने दोघांना घरी सोडले

मुंबई : मुंबईमधील करोनाबाधितांमध्ये गुरुवारी १५ जणांची भर पडली. त्यामुळे मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. मात्र त्याच वेळी दोन करोनाबाधितांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले असून घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या आता १० झाली आहे. दरम्यान, पालिकेने आपली रुग्णालये, कार्यालये, अलगीकरण केंद्र, अलगीकरणाचा सल्ला दिलेली घरे आदींची स्वच्छता आणि र्निजतुकीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे.

मुंबईमधील करोनाबाधित आणि संशयीतांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मात्र हळूहळू करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत गुरुवारी नवे १५ करोनाबाधित सापडले असून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी नऊ जण मुंबईतील, तर सहा जण मुंबईबाहेरील आहेत. आता मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कस्तुरबा रुग्णालयात दाखल दोन करोनाबाधितांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे या दोघांना गुरुवारी घरी पाठविण्यात आले.

कस्तुरबा रुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण विभागात गुरुवारी ४२९ जणांची करोनाविषयक तपासणी करण्यात आली असून १२४ संशयीतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

करोनाचा संसर्ग टाळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पालिकेचा कीटक नियंत्रण विभाग, अग्निशमन दलाने पालिकेची रुग्णालये, कार्यालये, अलगीकरण केंद्रे, अलगीकरण सल्ला दिलेली घरे, पॉझिटिव्ह चाचणी असलेली घरे, न्यायालये, सरकारी कार्यालये, पोलीस ठाणी, अन्य कार्यालये, रुग्णवाहिका, शववाहिन्या, सरकारी-पालिकेची वाहने आदीची स्वच्छता आणि र्निजतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही विभागांनी आतापर्यंत १,५२७ ठिकाणी स्वच्छता आणि र्निजतुकीकरण केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

देवनार पालिका वसाहतीमध्ये करोनाबाधित महिलेचा मृत्यू

मुंबई : देवनारच्या पालिका वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा बुधवारी करोनामुळे मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून या महिलेवर नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपासून या महिलेला श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिची प्रकृती बिघडल्याने तिला नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना या महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. चेंबूरमध्येच उपचार सुरू असताना करोनाच्या निदानासाठी तिचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये तिचा मृत्यू करोनामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या मृत्यूनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पालिकेने परिसरातील २० ते २५ जणांना बुधवारी तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात नेले होते. त्यानंतर यापैकी पाच जणांना कस्तुरबा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.