आरोपींची फाशी टळावी यासाठी त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी दिवसभर नाना युक्त्या करीत सुनावणी तहकूब करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत ‘सुरुवातीपासूनच आरोपींच्या वकिलांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नसून कामकाजादरम्यान आवश्यक सहकार्यही केले नाही’, असा ठपका त्यांच्यावर ठेवला़
टेलिफोन ऑपरेटरवरील सामूहिक बलात्कार खटल्यात दोषी ठरवून जन्मठेप सुनावण्यात आल्यावर तिघांविरुद्ध पुन:पुन्हा बलात्कार केल्याचा नवा आरोप ठेवून त्यांच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. ती मान्य करीत न्यायालयाने त्यांच्यावर हा आरोप निश्चित केला व त्यात त्यांना गुरुवारी दोषीही ठरविले. मात्र शुक्रवारी होणारी शिक्षेची सुनावणी टाळण्यासाठी आरोपींच्या वकिलांनी विविध युक्त्या करण्यास सुरुवात केली.
पहिली युक्ती
सर्वप्रथम हा आरोपींच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. तसेच निर्भया प्रकरणानंतर जी कायदेशीर सुधारणा करण्यात आली त्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे आरोपींवर आरोप निश्चित करून त्यांना दोषी ठरविण्यात आलेले आहे. शिवाय या खटल्याच्या निमित्ताने या आरोपाबाबत नवे मुद्दे उपस्थित झाले असून खुद्द उच्च न्यायालयानेही अ‍ॅटर्नी जनरलना याबाबत आपली नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठी सहा आठवडय़ांचा वेळ दिलेला आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर आणखी तीन दिवस सुनावणी तहकूब केली, तर काहीही बिघडणार नाही, अशी सूचना केली. परंतु शिक्षेचा निर्णय होण्याच्या टप्प्यावर ही मागणी करणे म्हणजे सुनावणीला विलंब करण्यासारखे असल्याचे स्पष्ट
करीत न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
दुसरी युक्ती
आरोपींच्या आईंची साक्ष घेऊ देण्याची नवी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. मात्र, संधी देऊनही नव्या आरोपांशी संबंधित साक्षीदार तपासण्यास आरोपींच्या वकिलांनी गुरुवारी नकार दिल्याने न्यायालयातर्फे ही मागणीही फेटाळून लावण्यात येणार होती. परंतु विजय जाधव आणि सलीम अन्सारीची आई न्यायालयातच उपस्थित असेल तर आरोपीचे वकील त्यांची साक्ष घेऊ शकतात, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगताच आरोपींच्या वकिलांनी त्या दोघी न्यायालयात नसल्याने सुनावणी तहकूब करण्याची मागणी पुन्हा केली. त्यावर दोघांच्या आई न्यायालयातच असल्याचे निकम यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे त्यांची साक्ष घेण्यात आली आणि पुन्हा आरोपींच्या वकिलांची युक्ती अयशस्वी ठरली.
तिसरी युक्ती
अखेर शिक्षा काय व्हावी याबाबत युक्तिवादास सुरुवात झाल्यावर आरोपींच्या वकिलांनी आपण युक्तिवाद करणार नसल्याचे सांगितले. मात्र निकम यांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आरोपीचे वकील म्हणून आपण आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावलेले नाही. सबब आपण वकीलपत्र मागे घेत आहोत, असे सांगत पुन्हा निकालाला विलंब करण्याचा शेवटचा प्रयत्न केला. तर न्यायालयानेही अशा महत्त्वाच्या क्षणी आरोपींच्या वकिलांनी घेतलेली ही भूमिका अयोग्य आहे, असे सांगत त्यांच्या असहकारावर नाराजी व्यक्त केली आणि खटल्याचे कामकाज पुढे सुरूच ठेवल़े

टेलिफोन ऑपरेटर तरुणीने उशिरा तक्रार केल्याने तो गुन्हा सिद्ध करणे खूप कठीण होते. परंतु गुन्हेगारांचा पूर्वेतिहास आणि गुन्हे करण्याची त्यांची वाढती प्रवृत्ती यामुळे त्यांच्यावर नव्या कलमाचा वापर करण्याचे ठरवले. समाजात कायद्याची भीती निर्माण करण्याचा हेतू त्यामागे होता. कायद्याची भीती निर्माण होईल आणि अशाप्रकारचे गुन्ह्यंना आळा बसेल. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केले. हे सामूहिक यश आहे.
उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

दोषींच्या आणखी एका साथीदाराला अटक
महालक्ष्मी येथील दरोडय़ाप्रकरणी फरारी असलेल्या एका आरोपीला ताडदेव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गेली दोन वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. मोहम्मद नियाज असे त्याचे नाव असून शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींचा तो साथीदार आहे. महालक्ष्मी स्थानकातील नियंत्रण कक्षात २०१२ साली एक दरोडा पडला होता. पाज जणांनी हा दरोडा घातला होता. या प्रकरणात पोलिसांनी आकाश जाधव आणि मोहम्मद कासम बंगाली यांच्यासह चौघांना अटक केली होती. मात्र मोहम्मद हुसेन नियाज (३३) हा आरोपी तेव्हापासून फरार होता. आकाश जाधव आणि कासम बंगाली हे नंतर जामिनावर सुटले आणि त्यांनी शक्ती मिलमध्ये बलात्कार केला़

न्यायालय म्हणते..
*फाशीची शिक्षा सुनावताना आरोपींच्या बाजूच्या आणि त्यांच्या विरोधातील बाबींचाही विचार करणे गरजेचे असते. परंतु या प्रकरणात आरोपींचे वय आणि त्यांची सामाजिक- आर्थिक स्थिती वगळता अन्य सगळ्याच बाबी त्यांच्या विरोधातच जाणाऱ्या आहेत. उलट या लहान वयातही त्यांनी कामवासना शमविण्यासाठी हा गुन्हा वारंवार केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या कृतीतून त्यांनी हा गुन्हा क्षणिक मोह म्हणून नाही तर अगदी व्यवस्थित पूर्वयोजना आखून केलेला आहे. गुन्ह्यांच्या आधी त्यांच्या परस्परांशी मोबाइलवर झालेल्या संवादाच्या सांकेतिक भाषेतून त्यांची महिलांकडे पाहण्याची मनोवृत्ती दिसून येते. त्यांच्यासाठी मुली या ‘शिकार’ असून ते ‘शिकारी’ आहेत. त्यामुळेच सामूहिक बलात्कारासारखा घृणास्पद गुन्हा करताना त्यांनी पीडित मुलींवर अतोनात अत्याचारही केलेले आहेत.
*या मुलींनी दयेची याचना करूनही आरोपींनी त्यांच्यावर वेगवेगळ्या अमानवी पद्धतीने बलात्कार केला. वर त्या मुलींच्या दयनीय स्थितीची खिल्लीही उडवली. त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होणे तर दूरच; पण क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यातच त्यांनी धन्यता मानल्याचे दोन्ही पीडित मुलींच्या साक्षीतून पुढे आलेले आहे. त्यांच्यासारख्या कामापिसाटांना दया दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळेच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येत आहे.
*अशा आरोपींना जर दया दाखवली तर ते न्यायाचे विडंबन ठरेल. या दोन्ही प्रकरणांतील पीडित मुलींचे कौतुक आहे की त्यांनी एवढय़ा यातनेनंतरही आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली. बलात्कार करताना वृत्तछायाचित्रकार तरुणीला दाखविण्यात आलेली मोबाइलवरील अश्लील फित साक्षीच्या वेळी तिला पुन्हा दाखविण्यात आली असता ती अक्षरश: कोसळून बेशुद्ध पडली. यावरूनच तिला काय वेदना होत आहे हे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर आरोपींचे वय लक्षात घेऊनही त्यांना दया दाखविणे हे न्यायाची खिल्ली उडविण्यासारखे आहे.
*आरोपींना सुधारण्याची संधी देण्याचाही प्रश्नच उद्भवत नाही. दोन आरोपी तर अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगार आहेत आणि बालन्यायालयाने जातमुचलक्यावर त्यांची सुटका करून त्यांना सुधारण्याची संधी दिली होती. परंतु बलात्कारासारखा अत्यंत गंभीर आणि वारंवार गुन्हा करून त्यांनी ही संधीही दवडली आहे.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद
केवळ सूडभावना म्हणून या फाशीची मागणी करण्यात आलेली नाही. त्यांची बलात्काराची पद्धत लक्षात घेऊन करण्यात आली आहे. त्यातही सामूहिक बलात्कार म्हणजे खून करण्यासारखेच आहे. आरोपी हे मनुष्य वेशातील कामापिसाट भुकेलेले पशु आहेत. त्यामुळेच अशा वृत्तींना आळा घालण्यासाठी त्यांना फाशी शिक्षा देणे उचित ठरेल, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.

सलीमच्या श्रीमुखात भडकविली
न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी कुटुंबियांची भेट घेतली. त्याच वेळी कासीमच्या आईने सलीमच्या जवळ जात त्याच्या श्रीमुखात भडकावली आणि ‘तुझ्यामुळे आज माझ्या मुलाला हा दिवस पाहावा लागत आहे’ असा त्रागा सुरू केला. त्यावर महिला पोलिसांनी तिला न्यायालयाबाहेर नेले. परंतु न्यायालयाच्या बाहेर बसलेल्या सलीमच्या कुटुंबियांशी तिचे भांडण जुंपले. अखेर कसेबसे पोलिसांनी कासीमच्या आईला तेथून दुसरीकडे हलविले आणि परिस्थिती निवळली.

कासीमच्या आईच्या उलटय़ा बोंबा
माझ्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्यांना ‘त्या’ मुलींचा दोष दिसत नाही का? त्यांना कुणी सांगितले होते ओसाड ठिकाणी फिरायला जायला? अशा उलटय़ा बोंबा मारत कासीमच्या आईने न्यायालयाच्या परिसरातच दोन्ही खटल्यांतील पीडित मुलींविषयी अपशब्द काढायला सुरुवात केली. महिला पोलिसांनी तिने गप्प करण्याचा प्रयत्न केला़  परंतु, तिची शिवीगाळ सुरूच होती़  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यामुळे आपल्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचा अजब दावा करीत त्यांच्या कुटुंबियांनाही तिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

पश्चात्तापाचा लवलेश नाही
तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यावर न्यायालयाने त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात बोलावून त्याची माहिती दिली. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा कुठलाही लवलेश नव्हता. शिक्षेविषयी काही बोलायचे आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केल्यावरही आपले काहीच म्हणणे नसल्याचे त्यांनी सांगितले. सुनावणीनंतर कुटुंबियांशी बोलतानाही त्यांच्यात फारसा बदल झाल्याचे दिसत नव्हते. शिक्षा सुनावण्याआधी मात्र आपण निर्दोष असून पोलिसांनी आपल्याला या प्रकरणात गोवल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.