वांद्रे येथील साईप्रसाद सोसायटी आरक्षित भूखंडावर उभारलेली नसून संस्थेने जागा मिळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी १३ वर्षे आधीच या जागेवरील आरक्षण उठविण्यात आले होते. ते उठविण्याशी सोसायटीचा कोणताही संबंध नाही. ‘आरक्षित जमिनीवरच साईप्रसाद’ या शीर्षकाखाली १ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताविषयी साईप्रसाद सोसायटीने हे स्पष्टीकरण केले आहे. सोसायटीने जागा मिळण्यापूर्वी अर्ज करण्याच्या सात वर्षे पूर्वी हा भूखंड निवासी झोनमध्ये होता. सोसायटीला सरकारकडून १६ जानेवारी २००३ रोजी भूखंड देण्यात आला. अधिकारी, न्यायाधीश, राजकारणी, क्रीडापटू, स्वातंत्र्यसैनिक आदींना अशा प्रकारे हजारो भूखंड शासनाने आतापर्यंत दिलेले आहेत. नॅशनल हेरॉल्ड आणि कौमी एकता यांना देण्यात आलेल्या भूखंडांपैकी सोसायटीचा भूखंड नाही. सरकारने दिलेल्या दंडावरील व्याजमाफीही सोसायटीसंबंधी नसून सोसायटीने सर्व आर्थिक देणी दिलेली आहेत, असे सोसायटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कंत्राटदाराच्याच तक्रारीनंतर ‘रिफ्रेश’ला टाळे
मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील १३ व १४ क्रमांकांच्या फलाटासमोरील खाद्यपदार्थाच्या ‘रिफ्रेश’ या दुकानाला बुधवारी संध्याकाळी मध्य रेल्वेने आरपीएफ व जीआरपी यांच्या मदतीने टाळे ठोकले. प्लॅटफॉर्मवरील ही खानपान सेवा ज्या कंत्राटदाराला चालवण्यास दिली होती त्यानेच रेल्वेला या दुकानाबद्दल तक्रार करणारे पत्र लिहिल्यावर ही कारवाई करण्यात आली. ‘रिफ्रेश’द्वारे पुरवण्यात येणारी खानपान सेवा आपल्याकडून पुरवण्यात आलेली नाही. अन्य माणसानेच त्यावर ताबा मिळवला असून त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्याला आपण जबाबदार नाही, असे त्याने या पत्रात लिहिले होते. अखेर रेल्वेने या दुकानाला टाळे ठोकले. या कंत्राटदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती.

सोन्याचे दागिने चोरणारी इराणी टोळी गजाआड
नवी मुंबई  : मोटारसायकलवरून महिल्यांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावणारी इराणी टोळी नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केली आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील १४४ गुन्ह्य़ांतील तब्बल ५२ गुन्ह्य़ांमध्ये या आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार भावांनी टोळी तयार केली असून त्यातील दोन जण सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या टोळीकडून तब्बल १ किलो ४३० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांनी दिली.
महंमद ऊर्फ अंडू अफसर सय्यद, शाजोद अफसर सय्यद, सकिना जॉन सय्यद, वैभव पाठक आणि जयेश गौतम ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सय्यद याचे दोन भाऊ अलिया अफसर सय्यद आणि कासिम अफसर सय्यद हे दोघे कारागृहात शिक्षा भोगत आहेत. सर्व आरोपी कल्याणमधील आंबिवली येथील रहिवासी आहेत.

‘आदर्श प्रकरणाची याचिका निकाली काढा’
मुंबई : ‘आदर्श’ सोसायटी घोटाळ्याचा तपास पूर्ण झाला असून विशेष न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी दाखल जनहित याचिका निकाली काढण्याची मागणी सीबीआयने बुधवारी उच्च न्यायालयात केली. सीबीआयला तपास करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारनेही सीबीआयच्या या मागणीला कुठलाही आक्षेप नसल्याचे या वेळी सांगत अप्रत्यक्षपणे आपल्या भूमिकेवरून ‘घूमजाव’ केले. प्रवीण वाटेगावकर, सिमप्रीत सिंह यांनी केलेल्या स्वतंत्र जनहित याचिकांवर न्या. पी. व्ही. हरदास आणि न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

खासगी बसचालकांवर वचक बसवण्याचे आदेश
मुंबई : सुट्टीच्या काळात खासगी बसचालक दुप्पट ते तिप्पट भाडे आकारतात. प्रवाशांना लुटणाऱ्या या वाहतूकदारांना वचक बसविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले. सरकारने खासगी बसभाडे नियंत्रित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून त्यानंतर पाच महिन्यांत खासगी बसभाडे नियंत्रणाबाबतची अधिसूचना काढावी, असेही न्यायालयाने सरकारला बजावले आहे.

गोरेगाव इमारत दुर्घटना; गुन्हा दाखल
मुंबई : गोरेगावमध्ये एक इमारत कोसळून दोघेजण ठार झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे.गोरेगावमधील प्रताप शॉपिंग सेंटरची इमारत मंगळवारी रात्री कोसळून त्यात नासीर शेख व परशुराम यादव हे दोघेजण ठार, तर पाचजण जखमी झाले.

‘त्या’ चार तरुणांच्या म्होरक्यांचा शोध सुरू
मुंबई : इराकमधील ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या कल्याणमधील चार तरुणांना या जाळ्यात ओढणारा कोण आहे, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाने दिली. २५ मे पासून गायब असलेल्या या चार तरुणांपैकी एकाने ‘अल्लाच्या सेवेसाठी जात आहे’ असे पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे. एक आठवडय़ाच्या इराकमधील धार्मिक यात्रेसाठी हे चार तरुण एका खासगी ट्रॅव्हल कंपनी मार्फत गेले होते. त्यांचे प्रत्येकी ६० हजार रुपये रोखीने भरण्यात आले होते. इराकमधील मोसुल शहरतात ते ‘इसिस’मध्ये सामील झाल्याची शक्यता आहे, असे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी सांगितले.

मतिमंद मुलीवर नोकराकडून बलात्कार
मुंबई : घरातील नोकरानेच मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव येथे उघडकीस आली आहे. मालाड पोलिसांनी या प्रकरणी बाबूलाल दोडियार (२४) या नोकराला अटक केली आहे. ही पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचेही उघड झाले आहे.