स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनात दोन हजार रुपयांची वाढ करण्याचा तर आयुर्वेद महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थीच्या विद्यावेतनात पाच हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनातील वाढ २ ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. सध्या त्यांना आठ हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जाते, ते आता दहा हजार रुपये होईल. त्याचा लाभ आठ हजार २५५ स्वातंत्र्यसैनिकांना होणार असून सरकारवर १९ कोटी ८१ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांना दरवर्षी १० हजार रुपयांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. आता ही रक्कम आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. राज्यातील केंद्रीय स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांना सरकार देत असलेल्या निवृत्तीवेतनाच्या २५ टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मंजूर केली जाणार आहे

आठवलेंची मंत्रिपदाबरोबर  राज्यपालपदाचीही मागणी
मुंबई : केंद्रात मंत्रिपद मागणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाच्या वाटय़ाला एक राज्यपालपदही मिळावे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे गुरुवारी केली. त्याचबरोबर भाजपच्या कोटय़ातून राज्यात विधान परिषदेच्या दोन जागा विधानसभेच्या १३ जागा, केंद्र सरकारच्या अखत्यारितील महामंडळे, अशा अनेक मागण्या त्यांनी शहा यांच्याकडे केल्या. रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या २० जागा आणि सत्तेत योग्य वाटा हवा आहे. मात्र जागावाटपाबाबत काही चर्चाच होत नसल्याने रिपब्लिकन नेते नाराज आहेत.

शिक्षकांना चार दिवस आधीच पगार
मुंबई : महिन्याच्या एक तारखेला बँकेच्या खात्यात येणारे वेतनाचे पैसे यंदा चार दिवस आधीच जमा झाले आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधीच पगाराचे पैसे शिक्षकांच्या हातात येण्याची ही घटना विरळाच असल्याने मुंबईतील तब्बल ३० हजार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षकांचे वेतन महिन्याच्या एक तारखेला जमा होते. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन १ सप्टेंबरला जमा होणे अपेक्षित होते. परंतु, चार दिवस आधी म्हणजे २८ ऑगस्टलाच वेतन बँकेत जमा झाल्याचे ‘एमएमएस’ शिक्षकांच्या सेलफोनवर धडकू लागल्याने आनंदाचा अनपेक्षित धक्का शिक्षकांनी गुरुवारी अनुभवला. गणेशोत्सवाच्या आधीच शिक्षकांना वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली होती.

सागरी सेतूवरून आणखी एक आत्महत्या
मुंबई : वांद्रे वरळी सागरी सेतूवरून उडी मारून गुरुवारी संध्याकाळी एका तरुणाने आत्महत्या केली. चिंतन शहा (३२) असे या तरुणाचे नाव असून तो कांदिवली येथे राहत होता. चिंतन हा  आपल्या आयटेन गाडीने कांदिवली येथील आपल्या घरी जात होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याने सागरी सेतूच्या दक्षिण दिशेला (सी लिंक) गाडी थांबवून समुद्रात उडी मारली. त्याचा मृतदेह शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याची गेल्या दहा दिवसातील ही दुसरी घटना आहे. तर गेल्या सहा महिन्यात पाच जणांनी या सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांविरोधात वॉरंट काढण्याचे आदेश
मुंबई  :जुलैच्या पहिल्या आठवडय़ातील संपात सहभागी झालेल्या ६०० कंत्राटी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या बडतर्फीला स्थगिती देऊनही त्यांना तातडीने कामावर रुजू करून न घेण्याच्या मुद्दय़ावरून उच्च न्यायालयाने आरोग्य खात्याच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांना गुरुवारी न्यायालयात हजर राहण्याचे बजावले होते. मात्र त्यानंतरही त्या गैरहजर राहिल्याने संतापलेल्या न्यायालयाने अखेर त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर जामिनाची पाच हजारांची रक्कम जमा केल्यानंतर सोमवारी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर राहण्याचेही न्यायालयाने बजावले आहे.  संपात सहभागी झालेल्या ६०० कंत्राटी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या बडतर्फीला स्थगिती देऊनही त्यांना तातडीने कामावर रुजू करून न घेण्याच्या मुद्दय़ावरून न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने बुधवारच्या सुनावणीत आरोग्य खात्याला फैलावर घेतले होते.