18 February 2019

News Flash

रविवारी ‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा, विजेत्याला दीड लाखाचं इनाम

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूही प्राथमिक फेरीत

सुनीत जाधव व अतुल आंब्रे, संग्रहित छायाचित्रे

भारतीय शरीरसौष्ठव क्षेत्रामध्ये मानाची मानली जाणारी मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या रविवारी 18 फेब्रूवारीला कांदिवलीच्या ठाकूर संकुलात पुन्हा एकदा रंगणार आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबई श्रीचे अभूतपूर्व आणि दिमाखदार असे आयोजन करणाऱया शिवतेज आरोग्य सेवा संस्थेनेच यंदाही या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवतेजच्या माध्यमातून होणाऱ्या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने शरीरसौष्ठवपटूंवर भरघोस पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार असून मुंबई श्रीचा मानकरी दीड लाखाचा मानकरी ठरेल, अशी माहिती स्पर्धा आयोजक आणि क्रीडाप्रेमी सिद्धेश रामदास कदम यांनी दिली.
मुंबई शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमी सर्वोच्च असलेल्या मुंबई श्री चा रूबाब आणि थरार यंदा भव्य आणि दिव्य असाच असेल, असे सांगण्यात आले आहे.

दोन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी 17 फेब्रूवारीला कांदिवली पूर्वेच्या ग्रोवेल मॉल येथे पार पडेल. ही स्पर्धा जिल्हा अजिंक्यपद असली तरी या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार आहे. गटातील अव्वल सहा खेळाडूंनाही एकूण 64 हजार रूपयांच्या रोख पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. तर बेस्ट पोजर आणि सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडूला प्रत्येकी 25 हजारांच्या पुरस्काराने गौरविले जाईल.

आशुतोष, सुजयकडे सर्वांच्या नजरा

मुंबईकरांना मुंबई श्री स्पर्धेत सुनीत जाधव, सागर कातुर्डे, रोहित शेट्टी, सचिन डोंगरे, अतुल आंब्रे आणि रोहन धुरी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूही प्राथमिक फेरीत उतरलेले दिसतील, असे आयोजकांनी सांगितले. महाराष्ट्र श्री स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी हे केवळ हजेरी लावतील. बहुतांश खेळाडू मुंबई श्रीचे विजेते असल्यामुळे यंदाही एका नव्या विजेत्याला मुंबई श्रीचा बहुमान मिळणार आहे. स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू उतरणार असले तरी सर्वांच्या नजरा आशुतोष साहाकडे लागलेल्या असतील. या उदयोन्मुख खेळाडूने गेल्या दोन महिन्यात ज्यूनियर मुंबई श्री, ज्यूनियर महाराष्ट्र श्री आणि ज्यूनियर भारत श्री अशी अनोखी हॅटट्रीक साजरी केली आहे. त्यामुळे मुंबई श्रीच्या निमित्ताने तो शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य प्रवाहात सामील होईल. त्याचप्रमाणे या मोसमात चार स्पर्धा जिंकून हंगामा करणाऱया सुजय पिळणकर हासुद्धा जबरदस्त तयारीत असल्यामुळे यावेळी मुंबई श्रीचा विजेता तगडा असेल.

तसेच सौरभ साळुंखे, रोहन गुरव, सुशांत रांजणकर, दीपक तांबीटकर हे तगडे खेळाडू स्पर्धेत आपले पिळदार स्नायू दाखविण्यासाठी सज्ज झाल्यामुळे यंदाही मुंबई श्री साठी तुंबळ युद्ध पाहायला मिळेल, अशी माहिती शरीरसौष्ठव संघटनेच्या राजेश सावंत आणि सुनील शेगडे यांनी दिली. या स्पर्धेतूनच आगामी महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी मुंबईच्या दोन संघांची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतील पारितोषिकांचा आकडा पाहता खेळाडूंचा विक्रमी सहभाग असेल असा विश्वास बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने व्यक्त केला आहे. या स्पर्धेबरोबर फिजीक स्पोर्टस् प्रकारातही पुरूष आणि महिला खेळाडूंची उपस्थिती फार मोठी असेल, असाही विश्वास संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि अमोल कीर्तीकर यांनी व्यक्त केला आहे.

शरीरसौष्ठवाचे प्रेम स्पर्धेतून दाखवणार- सिद्धेश कदम

दोन वर्षांपूर्वी मुंबई श्रीचे भव्य दिव्य आयोजन काय असते हे आम्हीच दाखवून दिले होते. त्यामुळे यंदाही आम्ही तेच ग्लॅमर पुन्हा दाखविण्यासाठी सज्ज झालो आहोत. या ग्लॅमरस स्पर्धेच्या आयोजनामुळे शरीरसौष्ठव खेळाकडे मोठ्या संख्येने सामान्य मुंबईकर वळत आहेत. आपल्या खेळाविषयी असेच प्रेम वाढावे आणि शरीरसौष्ठवाचा विकास व्हावा म्हणूनच मुंबई श्री शरीरसौष्ठवाचे भव्य दिव्य ग्लॅमर दरवर्षी घेण्याचा आपला मानस असल्याचे क्रीडाप्रेमी सिद्धेश कदम यांनी बोलून दाखविला.

मुंबईचा आणि सामान्य मराठीजनांचा आवडता खेळ असलेला शरीरसौष्ठव खेळ दिवसेंदिवस महागडा होत चालला आहे. या खेळात सातत्य दाखवणे खेळाडूंना अशक्य होऊ लागले आहे. त्यामुळे या स्पर्धेतील विजेत्याचा राज्य-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांसाठी होणारा सर्व खर्च तसेच त्याला वर्षभरासाठी लागणारा खुराक तसेच ग्रामीण भागातील उदयोन्मुख आणि होतकरू खेळाडूंनाही अशाच प्रकारचे आर्थिक पाठबळ देण्याचाही आपला प्रयत्न असल्याची माहिती आयोजक सिद्धेश कदम यांनी दिली.

First Published on February 14, 2018 2:02 pm

Web Title: mumbai shri body building competition will be held in mumbai on sunday