घोडेस्वारीची हौस सहा वर्षांच्या मुलीच्या जिवावर बेतली आहे. मुंबईतील कुपरेज मैदानात घोड्यावरुन पडून जान्हवी शर्मा या मुलीचा मृत्यू झाला असून जान्हवी तिच्या आई- वडिलांसोबत कुपरेज मैदानात आली होती.

कुपरेज मैदानात रविवारी घोडेस्वारीसाठी गर्दी होते. गिरगाव येथे राहणारी जान्हवी तिच्या आई-वडिलांसह आणि अन्य नातेवाईकांसह कुलाबा येथे फिरायला आली होती. शर्मा कुटुंबिय जान्हवीला घेऊन कुपरेज मैदानात गेले. तिथे जान्हवी एका घोड्यावर बसली. मात्र घोडेस्वारी करताना ती घोड्यावरुन पडली. संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. तिला तातडीने बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. बॉम्बे रुग्णालयातील डॉक्टरांनी संध्याकाळी सातच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती दिली. गंभीर दुखापत झालेल्या जान्हवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घोड्यावरुन पडल्याने जान्हवीच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि यामुळेच तिचा मृत्यू झाला.

जान्हवीच्या मृत्यूप्रकरणी घोडेस्वार सोहम जैस्वाल (वय ३०) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जान्हवी घोड्यावरुन कशी पडली हे अजूनही समजू शकलेले नाही. या घटनेमुळे शर्मा कुटुंबाला मानसिक धक्का बसला असून त्यांच्या जबाबानंतरच नेमके काय घडले हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह येथे घोडेस्वारीवर बंदी आहे, मात्र कुपरेज मैदानात बंदी नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले. जान्हवीचे वडील महेंद्र हे खासगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत

जैस्वाल घोड्याची देखभाल करायचा. तो कोणत्याही संघटनेचा सदस्य नाही, असे पोलिसांनी सांगितले. जून २०१५ मध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने घोड्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण केले नसल्याचे समोर आले आहे.