News Flash

पादचारी व्यवस्थापनाचा ‘स्कायफ्लॉप’

‘एमएमआरडीए’ने यापुढे नवीन स्कायवॉक न उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

 

चालण्याशिवाय सारे काही..

प्रेमी युगुलांच्या ‘गुफ्तगू’चे हक्काचे ठिकाण, मद्यपींचा व जुगाराचा अड्डा, भिकारी व गर्दुल्ल्यांचा आसरा, कचरा कुंडी, फेरीवाल्यांचे ठिकाण. तब्बल ७३२ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या मुंबईतील स्कायवॉकचा वापर या अशाही असंख्य कारणांकरिता होतो आहे. हे कमी म्हणून की काय, काही स्कायवॉकवरील बसण्याची बाके, लोखंडी सामान काही ठिकाणी पळवून नेलेले दिसते. रेल्वे प्रवाशांच्या सोयीचा विचार न करता, सुरक्षा, स्वच्छता, देखभालीची सोय न करता मुंबईच्या रेल्वे स्थानक परिसरात बांधलेल्या स्कायवॉकचा ‘लोकसत्ता-मुंबई’च्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा.

बहुतांश स्कायवॉकवर फेरीवाले, गर्दुल्ले आणि प्रेमवीरांचे बस्तान

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच प्रमुख स्थानकांबाहेरील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था लक्षात घेत स्थानकाबाहेर पडणाऱ्या पादचाऱ्यांचे चालणे सुसह्य़ करण्यासाठी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने एकूण ३६ स्कायवॉक उभारले. या स्कायवॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर ते संबंधित शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या ३६ स्कायवॉकची एकूण लांबी २४.४८७ किमी एवढी असून त्यासाठी ७३२.७३ कोटी एवढा प्रचंड खर्च झाला आहे. परंतु, दररोज या स्कायवॉकवरून हजारो लोक चालण्याची अपेक्षा असताना काहीशे लोक या ‘आकाश मार्गिके’चा वापर करताना दिसत आहेत. त्याहून धक्कादायक म्हणजे, ३६ पैकी बहुतांश स्कायवॉक सध्या फेरीवाले, भिकारी, गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुलांचे अड्डे बनत चालले असल्याने येथून ये-जा करणाऱ्यांनीही आपला मार्ग बदलण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर ‘एमएमआरडीए’ने यापुढे नवीन स्कायवॉक न उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

एमएमआरडीएने पश्चिम उपनगरांत १३, पूर्व उपनगरांमध्ये ११ आणि ठाणे व पालघर जिल्ह्य़ात १२ स्कायवॉक बांधले. या स्कायवॉकचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्यांचा ताबा ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएमधील सूत्रांनी दिली.

मात्र, योग्य देखभाल होत नसल्याने तसेच पादचाऱ्यांकडून वापर होत नसल्याने बहुतांश स्कायवॉक आता निर्जन स्थळे बनत चालले आहेत. याठिकाणी प्रेमीयुगुले, भिकारी, गर्दुल्ले आणि फेरीवाले यांनी आपला डेरा टाकला आहे. परिणामी स्कायवॉक सोयीपेक्षा तापदायक ठरू लागले आहेत. तसेच हे ३६ स्कायवॉक बांधण्यासाठी ७३२.७३ कोटी रुपये एवढा प्रचंड खर्च आला आहे. या एवढय़ा खर्चानंतर एमएमआरडीएने उर्वरित स्थानकांबाहेर स्कायवॉक बांधण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला आहे. ज्या कारणासाठी स्कायवॉक बांधले आहेत, त्यासाठी त्यांचा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे आणखी काहीशे कोटी रुपये खर्च करून नवे स्कायवॉक बांधण्यात काहीच हशील नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

स्कायवॉक कुठे?

  • पश्चिम उपनगरांमध्ये वांद्रे पूर्व (कलानगर-न्यायालय), वांद्रे पश्चिम, दहिसर पूर्व, सांताक्रूझ पश्चिम, सांताक्रूझ पूर्व, अंधेरी पूर्व, बोरिवली पश्चिम, विलेपार्ले पश्चिम, दहिसर पश्चिम अशा ठिकाणी स्कायवॉक उभारले गेले.
  • पूर्व उपनगरांमध्ये कांजूरमार्ग, विद्याविहार पश्चिम, विद्याविहार पूर्व, चेंबूर, कॉटन ग्रीन, विक्रोळी पश्चिम, घाटकोपर पूर्व, शीव, वडाळा आदी ठिकाणी स्कायवॉक बांधण्यात आले.
  • ठाणे व पालघर जिल्ह्य़ात ठाणे पूर्व, कल्याण पश्चिम, उल्हासनगर पूर्व, अंबरनाथ पश्चिम, उल्हासनगर पश्चिम, बदलापूर पूर्व व पश्चिम, भाईंदर, मीरा रोड, वसई, विरार अशा ठिकाणी स्कायवॉकची बांधणी केली आहे.
  • या ३६ स्कायवॉकपैकी वांद्रे-कलानगर (१३०० मी.), वांद्रे पश्चिम (१०५० मी.), बोरिवली पश्चिम (१३८० मी.), ठाणे पूर्व (१३५० मी.), कल्याण पश्चिम (१५०१ मी.) आणि कांदिवली पूर्व (१०२५ मी.) या स्कायवॉकची लांबी एक किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
  • सर्वात छोटा स्कायवॉक विद्याविहार पूर्वेला असून त्याची लांबी १९० मीटर एवढीच आहे.

घाटकोपर (पूर्व आणि पश्चिम)

घाटकोपरच्या पूर्वेला आणि पश्चिमेला स्कायवॉक बांधण्यात आले आहेत. मात्र अवघ्या काही वर्षांतच त्यांची दुर्दशा झाली आहे. प्रवाशांकडून फारसा वापर होत नसल्याने पश्चिमेचा स्कायवॉक प्रेमी युगुलांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. येथील लोखंडी कांबांवरील रंगरंगोटीवरूनही याचा अंदाज येतो. महाविद्यालयीन तरुणदेखील येथे ‘टाईमपास’ म्हणून येतात. अनेकदा तरुण-तरुणींचे अश्लील चाळे या ठिकाणी सुरू असतात. त्यामुळे, लहान मुलांना घेऊन जाणाऱ्यांची पंचाईत होते. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर कारवाई होते. परंतु, काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे होते, अशी तक्रार एका महिला प्रवाशाने केली. स्कायवॉकच्या पायऱ्यांवरील लाद्या उखडलेल्या अवस्थेत आहेत, तर काही पायऱ्यांवर लाद्याच नाहीत. पूर्वेकडील स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी आणि भिकाऱ्यांनी पथारी पसरलेली पाहायला मिळते. अनेक ठिकाणी जाहिरांतीमुळे स्कायवॉक विद्रूप झालेला आहे.

कॉटनग्रीन (पश्चिम)

हा स्कायवॉक काळाचौकी विभागातील नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आला होता. परंतु स्कायवॉक कडे नागरिकांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. स्कायवॉकच्या अभ्युदयनगर दिशेकडील मार्गाचा वापर होतो. मात्र श्रावण यशवंत चौक दिशेच्या मार्गाकडे शुकशुकाटच असतो. अभ्युदय नगरकडील मार्गाचा वापर होऊनही तिथे अनेक भिकारी वास्तव्यास असतात. त्यामुळे त्यांच्या पसरलेल्या पथाऱ्यांमधूनच मार्ग काढत रेल्वे स्थानक गाठावे लागते.

विक्रोळी (पश्चिम)

विक्रोळी पूर्वेकडील स्कायवॉकचा फारसा वापर होत नसल्यानेही इथे घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. चौकशी केली असता गेले तीन महिने या स्कायवॉकवर साफसफाईच न झाल्याचे समजले. कागदाचे गोळे, प्लास्टिकच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटे, श्वानांची विष्ठा अशी दुनियाभरची घाण या स्कॉयवॉकवर आहे. प्रवाशांकडून वापर होत नसल्याने येथे जुगाराचा खेळही रंगतो.

सांताक्रूझ (पश्चिम)

सांताक्रूझ पश्चिमेलगतच्या स्कायवॉकवरील पायऱ्यांवरील लाद्यांचे तुकडे उखडले आहेत. त्यामुळे, चालताना प्रवाशांची गैरसोय होते. येथेही फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. फेरीवाल्यांनी तर स्कायवॉकचा अध्र्याहून अधिक भाग रस्ता व्यापला आहे.

 दहिसर (पश्चिम)

दहिसरच्या स्कायवॉकवर रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यांचे मद्यपान चालते, तर सकाळच्या वेळेस फारशी रहदारीच नसल्याने ते प्रेमी युगुलांचे हक्काचे ठिकाण बनते. स्कायवॉकवरील बसण्यासाठी तयार केलेल्या बाकांचे काही भाग काढून नेण्यात आले आहेत. स्कायवॉकच्या आजूबाजूचे लोखंडाचे भागही काढून नेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

कांदिवली (पूर्व आणि पश्चिम)

कांदीवली स्थानक पूर्व ते पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत लांबी असलेल्या स्कायवॉकवर अतिक्रमणविरोधी सूचना देणाऱ्या फलकासमोरच फेरीवाल्यांनी आपली दुकाने मांडली आहेत. पूर्व भागातील प्रवासी स्कायवॉकवरून ये-जा करतात. मात्र, रात्रीच्या वेळी जवळच्या मंदिराबाहेरील भिकारी तसेच वेठबिगार कामगारांनी स्कायवॉकचा ताबा घेतलेला दिसतो. दिवसा अनेकांचे कपडे-लत्ते आणि अन्य साहित्य येथे पसरलेले दिसून येते. स्कायवॉकवरील अस्वच्छता आणि दरुगधी तर विचारूच नका.

नानाचौक

ऑपेरा हाऊस, गिरगाव चौपाटी, पेडर रोड, ताडदेव, ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानक, ग्रॅन्ट रोड मार्केटच्या दिशेने असे सहा रस्ते नाना चौकात एकत्र येतात. म्हणून नाना चौकातील वर्दळ कमी करण्यासाठी आकर्षक असा गोलाकार स्कायवॉक बांधण्यात आला. परंतु पादचाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली असून गर्दुल्ले, बेघर आणि फेरीवाल्यांनी या स्कायवॉचा ताबा घेतला आहे. सुरक्षितता आणि स्वच्छतेची स्कायवॉकवर व्यवस्था नाही. किरकोळ कामे करीत आपल्या कुटुंबाची गुजराण करणाऱ्या अनेक कुटुंबानी या स्कायवॉकवर आपला मुक्कामच ठोकला आहे. काही वेळा स्कायवॉकवरून थेट नाना चौकात कचरा भिरकावला जातो. तो वाहने अथवा पादचाऱ्यांवर पडतो. ठरावीक वेळेला मोठय़ा संख्येने तेथे गर्दुल्ल्यांचे वास्तव्य असते.

एका बाजूने हा स्कायवॉक ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकात जाणाऱ्या पुलाला जोडण्यात आला आहे. मात्र स्कायवॉकवर तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांनी स्कायवॉकवरून रेल्वे स्थानकाबाहेर उतरावे लागते. तिकीट काढून पुन्हा पुलावरून दोन, तीन किंवा चार क्रमांकाच्या फलाटावर जावे लागते. हा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी प्रवासी या स्कायवॉककडे पाठ फिरवत पदपथावरूनच चालणे पसंत करीत आहेत. सरकते जिने बंदच असल्याने पायपीट करीत स्कायवॉकवर जाण्याचे पादचारीही टाळत आहेत. स्कायवॉकसाठी नाना चौकात मध्येच मोठमोठे खांब उभारण्यात आले आहेत. हे खांब वाहतुकीला अडथळा बनले असून त्यामुळे एखाद्या दिवशी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भांडुप (पश्चिम)

भांडुप रेल्वे स्थानकाला लागूनच असलेला स्कायवॉक पश्चिमेला लाल बहादूर शास्त्री मार्गापर्यंत विस्तारलेला आहे. तो होण्यापूर्वी प्रवाशांना भांडुप स्टेशन रोडवरूनच फेरीवाले, रिक्षा व बस स्थानक यांमधून वाट काढत रेल्वे स्थानक गाठावे लागे. त्यामुळे स्कायवॉकचा मोठय़ा प्रमाणावर वापर होताना दिसतो आहे. हा स्कॉयवॉक भांडुपच्या फलाट २,३ आणि ४ ला जोडतो. परंतु, १वर येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर येऊन वळसा घालून जावे लागते.

वडाळा (पूर्व)

हा स्कायवॉक पूव्रेला अन्टॉप हिल, बरकत अली नाका, विद्यालंकार महाविद्यालय रस्ता या परिसराला जोडतो. या सगळ्या परिसरातील नागरिक आणि विद्यालंकार महाविद्यालयाचे विद्यार्थी वडाळा पश्चिमेला आणि रेल्वे स्थानकात जाण्यासाठी त्याचा पुरेपूर वापर करतात. आधी नाडकर्णी पार्क वसाहतीमधून वाट काढत रेल्वे स्थानक गाठावे लागे. प्रवाशांच्या वापरात असला तरी स्कायवॉकची अवस्था देखभालीअभावी दयनीयच आहे. भाजीवाले, मोबाईल साहित्य विक्रेते यांनीच हा स्कायवॉक व्यापला आहे. पावसाळ्यात छत्री दुरुस्त करणाऱ्यांच्या तर रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत.

बोरिवली (पश्चिम)

बोरिवली पश्चिमेकडील स्कॉयवॉकचा जणू फेरीवाल्यांनीच कब्जा घेतला आहे. फेरीवाल्यांनी स्कायवॉकच्या पायऱ्यांवरच दुकाने थाटली आहेत. त्यामुळे चढता-उतरताना प्रवाशांना त्यांच्या बस्त्यांमधूनच मार्ग शोधावा लागतो. या शिवाय मोबाईलचे हेडफोन, चपला, कपडे, फळे-भाज्या अशा विविध वस्तू एका छताखाली उपलब्ध होण्याचे हे बोरिवलीकरांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. अधूनमधून पालिका कारवाई करते. पण, त्यांची पाठ फिरताच फेरीवाले पुन्हा स्कॉयवॉकचा कब्जा घेतात. शिवाय भिकारी आणि गर्दुल्ल्यांच्या आसऱ्याचेही हे ठिकाण आहेच.

(वार्ताकन – रोहन टिल्लू, अक्षय मांडवकर, किशोर कोकणे, तेजस परब)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 3:16 am

Web Title: mumbai skywalk condition
Next Stories
1 महापालिकेच्या नाकाखालीच खड्डे
2 प्रियकराने सेल्फी नष्ट न केल्याने तरुणीची आत्महत्या
3 मुंबईकरांच्या पाण्याची बेगमी!
Just Now!
X